बारामतीकरांना पालिकेकडून अधिक कार्यक्षम कारभाराची अपेक्षा

बारामतीकरांना पालिकेकडून अधिक कार्यक्षम कारभाराची अपेक्षा

बारामती, ता. २ ः शहराच्या वैभवशाली इतिहासाची साक्षीदार असलेल्या बारामती नगरपालिकेचा १ जानेवारी हा वर्धापनदिन असतो. पारतंत्र्यापासून ते स्वातंत्र्यापर्यंत आणि अठराव्या शतकापासून ते थेट विसाव्या शतकापर्यंत जवळपास १५७ वर्षांच्या विविध स्थित्यंतराची नगरपालिका साक्षीदार आहे. २०२२ या नववर्षात बारामतीकरांना अधिक चांगल्या सुविधा नगरपालिकेच्या मार्फत दिल्या जातील व लोकांचे जीवन अधिक सुखकर बनेल अशी अपेक्षा आहे.
दरवर्षी नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बारामतीकरांसाठी सर्वात महत्त्वाची संस्था असलेल्या नगरपालिकेकडून अनेक अपेक्षा असतात. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने नवीन नगरसेवक अधिक कार्यक्षम व परिपूर्ण कारभार करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतील अशी लोकांना खात्री वाटते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी युद्धपातळीवर अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प बारामतीत हाती घेतले आहेत, ते स्वतः जातीने दर आठवड्यात याचा आढावा घेतच असतात, मात्र तरीही नगरपालिका स्तरावर स्वच्छता, पथदिवे, पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, चांगले रस्ते या सारख्या मूलभूत सुविधा मिळाव्यात अशी सर्वांचीच रास्त अपेक्षा आहे.

रस्त्यांच्या दुरुस्तीचे आव्हान
नगरपालिकेकडे रस्ते दुरुस्तीसाठीचा पुरेसा निधी उपलब्ध आहे, असे प्रशासन सांगते, त्यामुळे नवनिर्वाचित नगरसेवकांकडून रस्ते दुरुस्ती, डांबरीकरण व उपनगरात नव्या रस्त्यांची निर्मिती करण्याचे आव्हान आहे. अनेक ठिकाणच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे, त्याची तातडीने दुरुस्ती करून बारामती शहर खड्डेविरहीत होईल अशी नव्या वर्षात नगरपालिकेकडून लोकांची अपेक्षा आहे.

महिला स्वच्छतागृहांचा प्रश्न सुटावा
बारामती नगरपालिकेच्या मतदानामध्ये निम्म्या मतदार महिला आहेत, या परिस्थितीत बारामती शहरात महिलांसाठी स्वतंत्र व स्वच्छ स्वच्छतागृहांचा प्रश्न मार्गी लागावा अशी महिलांची अपेक्षा आहे. महिलांसह इतरही स्वच्छतागृह व काही ठराविक ठिकाणी सार्वजनिक शौचालयां उभारणीचा कार्यक्रम नव्या वर्षात नगरपालिकेकडून घेतला जावा अशी अपेक्षा आहे.

वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी
शहरातील ठराविक रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडी, बहुसंख्य रस्त्यावरील अस्ताव्यस्त पार्किंग, लाखो रुपये खर्चून बंद अवस्थेत असलेले ट्रॅफिक सिग्नल सुरु करणे अशी अनेक कामे नवीन वर्षात नगरपालिकेकडून होतील अशी आशा आहे. अतिक्रमणांचा प्रश्न दूर करत विविध चौकातील वाहतूक सुरळीत व्हावी अशी मागणी आहे.

मुलांना खेळण्यासाठी मैदान हवे
नगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या जागांवर क्रीडांगण तयार करून मुलांना खेळण्यासाठी शहरात जागा करून देण्याची नागरिकांची मागणी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमचा अपवाद वगळला तर शहरात क्रीडांगणच नाही, त्या मुळे नव्या वर्षात नगरपालिकेने जाणीवपूर्वक मुलांसाठी क्रीडांगण विकसित करावे अशी नागरिकांची भावना आहे.

कचरा डेपोचे स्थलांतर गरजेचे
भिगवण रस्त्यावरील कचरा डेपोचे स्थलांतर हा गंभीर विषय असून नव्या वर्षात नगरपालिकेने निर्धारपूर्वक या कचरा डेपोचे स्थलांतर करावे, अशी बारामतीकरांची मागणी आहे. या बाबत सर्वांनी इच्छाशक्ती दाखविल्यास हे काम अवघड नसल्याचे नागरिकांचे मत आहे.

पथदिवेही क्षमतेने सुरु असावेत
बारामती शहरातील पथदिव्यांचे जाळे उत्तम आहेत. परंतु, त्याच्या देखभाल दुरुस्तीची गरज आहे. अनेक ठिकाणी दिवे बंद अवस्थेत असतात, टायमरचा प्रश्न कायमच असतो, या बाबीकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com