बारामतीवरील टँकरचा शिक्का पुसणार

बारामतीवरील टँकरचा शिक्का पुसणार

बारामती, ता. ७ : गेल्या अनेक वर्षांपासून टंचाईच्या झळा सोसणाऱ्या बारामती तालुक्याच्या जिरायती भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता कायमचा संपुष्टात येणार आहे. वर्षानुवर्षे जिरायती व टँकरचा शिक्का पुसण्याची तयारी आता झाली असून, या योजनेच्या कार्यान्वयनानंतर बारामतीची वाटचाल खऱ्या अर्थाने टँकरमुक्तीच्या दिशेने होणार आहे.

बारामती तालुक्यातील ५५ गावे व ४२१ वाड्या वस्त्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राज्य सरकारने तब्बल ३४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेले टँकरमुक्तीचे आश्वासन आता लवकरच पूर्ण होईल, अशी चिन्हे आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर व पंचायत समितीच्या सभापती नीता फरांदे यांनी दिली.
बारामती मतदारसंघातील सहा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या ३४५ कोटी रुपयांच्या प्रशासकीय कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रशासकीय मान्यतेचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केले. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची गैरसोय दूर व्हावी, यासाठी पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘जल जीवन मिशन’अंतर्गत ही प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी पाटबंधारे व महसूल विभागाची ५५ एकर जमीन निश्चित केली असून नीरा डावा कालव्यानजीक साठवण तलाव, जलशुद्धीकरण केंद्र, जलकुंभ यांची कामे या जमिनीवर होतील. या प्रकल्पात योजनेसाठी सौरऊर्जेद्वारे वीज उपलब्ध करण्याचे नियोजन केले आहे.


योजना व मंजूर निधी (रुपयांत)
• देऊळगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना- ६५.०८ कोटी
• सुपे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना- ५७.९८ कोटी
• लोणी भापकर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना- ५७.५८ कोटी
• गोजुबावी-खराडेवाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना- ५१.१५ कोटी
• कटफळ-जैनकवाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना- ६४.३८ कोटी
• थोपटेवाडी-लाटे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना- २०.७० कोटी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com