डॉ. गावडे यांची यशोगाथा युवकांसाठी प्रेरणादायी

डॉ. गावडे यांची यशोगाथा युवकांसाठी प्रेरणादायी

मनात जिद्द असल्यास प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश संपादन करता येते, ही बाब बारामतीचे प्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. पांडुरंग गावडे यांनी सिद्ध करुन दाखवली आहे. त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण, बारामतीच्या आर. एन. आगरवाल टेक्निकल हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेत एम.बी.बी.एस.ची पदवी संपादन केली.
मोलमजुरी करणारे आई-वडील व परिस्थिती अत्यंत बेताची असताना या परिस्थितीवर मात करून मोठ्या जिद्दीने शिक्षण पूर्ण करून आज पंचक्रोशीतील तब्बल २५ हजार रुग्णांवर उपचार व सात हजारांहून अधिक शस्त्रक्रिया करण्याची कामगिरी डॉ. पांडुरंग गावडे यांनी करून दाखविली आहे. युवकांसाठी ही यशोगाथा प्रेरणादायी ठरावी अशीच आहे.
डॉ. गावडे हे पुरंदर तालुक्यातील नाझरे कडेपठार येथे ज्या झोपडीत वास्तव्य होते, ती एक दिवशी अचानकच जळून गेली. त्यानंतर ते बारामती तालुक्यातील मेडद या त्यांच्या मूळगावी परतले. टेक्निकल हायस्कूलमध्ये शिकताना हुशार विद्यार्थी असल्याने, ‘तू, एम.बी.बी.एस.ला प्रवेश घ्यायचा,’ असा शिक्षकांचा आग्रह होता. त्यानुसार गुणवत्तेच्या जोरावर तळेगाव येथे त्यांना मोफत कोट्यातून प्रवेशही मिळाला आणि बघता बघता ते अस्थिरोगतज्ज्ञही बनले.
डॉ. गावडे यांनी एक वर्ष दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे मेडीकल ऑफिसर म्हणून नोकरी केली. पण, पदव्युत्तर शिक्षणाच्या ओढीने त्यांनी नोकरीला रामराम केला. त्यानंतर सन २००८ मध्ये बारामतीतील शरदचंद्र पवार उद्योग भवनात त्यांनी रुग्णालय सुरु करून वैद्यकीय सेवेचा श्रीगणेशा केला. लवकरच ही जागा त्यांना अपुरी पडू लागल्याने देवळे इस्टेटमध्ये त्यांनी जागा घेत ‘गावडे हॉस्पिटल’ची उभारणी केली.

पाच जिल्ह्यांतून रुग्ण
अपघातातील रुग्णांना एकाच छताखाली अस्थिरोगाबाबत सर्व सेवा मिळावी, या उद्देशाने सुरु केलेले हे रुग्णालय अल्पावधीतच लोकप्रिय झाले. आज पाच जिल्ह्यातून रुग्ण त्यांच्याकडे अस्थिरोगाबाबत सल्ला व उपचारासाठी येतात. आज येथे सीटी स्कॅन, ट्रॉमा केअर युनिटसह सुसज्ज ऑपरेशन थिएटरही आहेत. अनेक रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. त्यांच्या आजवरच्या या प्रवासात त्यांची पत्नी डॉ. उज्वला गावडे यांनी त्यांना प्रत्येक टप्प्यावर मोलाची साथ दिली आहे, त्यांच्या यशात उज्वला गावडे यांचा मोलाचा वाटा आहे.

आयर्नमॅन किताबाचे मानकरी
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत डॉ. पांडुरंग गावडे यांनी ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण करून हा किताब पटकाविला. शरीर सुदृढ राहायला हवे, या उद्देशाने त्यांनी स्वतःही स्पर्धा पूर्ण करून बारामतीच्या युवकांपुढे एक आदर्श घालून दिला आहे.

सामाजिक उपक्रमातही सहभाग
विद्यार्थ्यांना उपक्रमाद्वारे मदत करण्यासह वृक्षारोपणाच्याही उपक्रमात त्यांचा सहभाग आहे. मोफत वधू वर मेळाव्याचेही त्यांनी आयोजन केले आहे. अनेक रुग्णांनाही त्यांनी उपचार करताना मदतीचा हात पुढे केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com