शिरूर पुरवणी लेख | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूर पुरवणी लेख
शिरूर पुरवणी लेख

शिरूर पुरवणी लेख

sakal_logo
By

प्रेमाची ''परी''भाषा वाढली तर...

नवे वर्ष, नवा ध्यास... नवी उर्मी, नवा श्‍वास... नावीन्याचा सांगावा घेऊन दरवर्षीच नवे वर्ष येते आणि जाते. पण काही वर्षे ही काही नवनिर्माणामुळे खास स्मरणात राहतात, तर काही आपल्यांना आपल्यातून हिरावून अंतःकरणात कुठेतरी बोच देऊन जातात. तरीही प्रत्येक वर्षी नववर्षाचे स्वागत त्याच जोमाने होते. कारण नवनिर्मितीचे अप्रूप, नावीन्याचा ध्यास आणि नव्याचे स्वागत हे मानवी मनाचे कंगोरे आहेत. नावीन्य आणि प्रेमाची ही ''परी''भाषा प्रत्येक नव्या वर्षासोबत वाढीस लागली तर जुनाट विचारांना आणि वाईटाला अर्थात अमंगलाला कुठे जागाच राहणार नाही, नाही का...
- श्रावणी प्रदीप बारवकर

माझ्या आईला बागकामाची, रोपे लावायची खूप आवड. अगदी स्वतःच्या लेकरांप्रमाणे ती त्यांना जीव लावते, वाढवते. दोन वर्षांपूर्वी तिने आमच्या परसबागेत अनंताचे रोप लावले. मनापासून त्याची काळजी घेतली. त्याला नियमीत खतपाणी घातले. पण दोन वर्षे या रोपाला कळी काही फुटली नाही. तरीही माझ्या आईने कधी आशा सोडली नाही. ती म्हणते, त्यांनाही प्रेमाची गरज असते. प्रेम भेटले की ती देखील जोमाने वाढतात. मला तिच्याकडे असणाऱ्या या उत्कट संयमाचे व असीमित प्रेमाचे कायम कौतुक वाटते. परंतु मागील काही महिन्यांपूर्वी माझी गरोदर बहीण माहेरी आली आणि आईचे तिच्याकडे लक्ष देताना साहजिकच झाडांकडे काहीसे दुर्लक्ष झाले. तरीही ती मला किंवा माझ्या वडिलांना अधेमधे पाणी घाला, सुकलेली पाने काढा अशी कामे सांगत असे. ही कामे करताना मी कधी नकळत, तर कधी आवर्जून त्या अनंताच्या झाडाकडे बघत असे, की कधीतरी याला अंकुर फुटेल, कधीतरी याची पाने - फुले बहरतील, कधीतरी यावर एखादी कळी उमलेल. पण व्यर्थ... कालांतराने मी तर त्या झाडाला कधी फूल येईल, अशी आशाच सोडून दिली होती. काही महिने गेले आणि माझ्या बहिणीने एका गोंडस "परी'' ला जन्म दिला. त्यानंतर काही दिवसांनी दोघींना दवाखान्यातून घरी आणले. अगदी दणक्‍यात मायलेकीचे स्वागत झाले. या सगळ्या तयारीत काही दिवस कुणीच झाडांकडे पाहिले नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी आई झाडांना पाणी घालायला गेली आणि बाहेरूनच सगळ्यांना मोठमोठ्याने आवाज देऊ लागली. आम्हीही काय झाले म्हणून पाहायला गेलो. तर आईचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता, तिच्या घामेजलेल्या चेहऱ्यावर समाधानाची एक वेगळीच झळाळी उमटली होती. कारण, आमच्या अनंताला कळी फुटली होती आणि हे मी खात्रीने सांगू शकते, नात झाली त्यादिवशी इतकाच आनंद तिला ती कळी पाहून होत होता.

प्रेमाचे दुसरे भंडार म्हणजे "माई''...
निसर्गालाही नवनिर्मितीची जाणीव होते आणि तो देखील आपल्याकरिता आनंदित होतो, याचा सबळ पुरावा माझ्याकडे डोळ्यांसमोर होता. निसर्गाची तुलना ''आई''शी का करतात, हे माझ्या लक्षात आले होते. जगात आईसारखे प्रेम दुसरा कुणीही करू शकत नाही, असे म्हणतात पण मग असे अविरत प्रेम देणारा निसर्ग तर आपल्या भोवतालीच आहे ना आणि याच अविरत प्रेमाचे मी आयुष्यात पाहिलेले दुसरे भंडार म्हणजे "माई''...

अनाथांच्या आयुष्यात फुलविला आनंद
काल-परवाच एका घटनेने संपूर्ण देशाला रडविले. अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधूताई सपकाळ देशाला अनाथ करून अनंताच्या वाटेला निघून गेल्या. माझ्या आईने फुलविलेल्या एका फुलाकरिता मला झालेला आनंद त्यांनी हजारो अनाथ मुलांच्या आयुष्यात फुलविलेल्या आनंदासमोर मला क्षुल्लक वाटला. परंतु या सगळ्यात मला कळाली ती प्रेमाची खरी परिभाषा आणि त्या प्रेमातून मिळणारा परमानंद. जर आपल्याला आनंदी होण्याकरिता काही कारणच लागत असेल; तर तो आनंद क्षणभंगुर आहे.

जगात वाटलेले प्रेम चिरंजीव
जे लोक सदैव जगात प्रेम वाटत राहतात, ते मुळी दुःखी होऊच शकत नाहीत. आता माईंचंच पाहा ना, त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे दुःख सोसले, ते कल्पनेपलिकडचे आहे. पण तरीही त्या दुःखाने त्यांच्या मनातील प्रेमरूपी ज्योत अखेरपर्यंत विझली नाही. त्या आयुष्यभर प्रेम वाटत राहिल्या. जगात द्वेष पसरविणाऱ्या हजारो व्यक्ती जन्माला आल्या, तरी प्रेम पसरविणारी एक व्यक्ती कायम श्रेष्ठ ठरेल, आणि माई त्याचे उत्तम उदाहरण आहेत. त्यांनी जगात वाटलेले प्रेम चिरंजीव आहे. त्यांनी त्यांच्या हजारो मुलांना वारसा म्हणून त्यांचे निरामय प्रेम
दिले आहे. आणि तो वारसा ते तेवढ्याच जिव्हाळ्याने जपतील याची सर्वांनाच खात्री आहे.

देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे...
माझ्या आईनेही अनंताच्या त्या झाडाला खूप प्रेम दिले. पण त्या झाडाला मात्र प्रेम घेण्यापेक्षा प्रेम देण्याची जास्त इच्छा होती, असे मला वाटते. घेणाऱ्या प्रेमापेक्षा देणारे प्रेम किती महान आहे, हे मला जाणवले. "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे'''', ही विंदा करंदीकरांची कविता कदाचित निसर्गाला आणि माईंसारख्या विलक्षण व्यक्तीमत्वांना उद्देशून असावी, असे वाटते. अर्थात ना निसर्गाइतके आपले हात मोठे ना माईंइतके आपले ह्रदय विशाल. परंतु तरीही आपापल्या "परी'' ने प्रत्येकाने प्रयत्न करण्यात काय हरकत आहे.

(लेखिका ही नवोदित कवयित्री असून, `STRANGERS` नावाच्या आंतरराष्ट्रीय साहित्य संग्रहात तिच्या `STRANGER IN A TROOP` आणि `STILL A STRANGER` या कविता प्रकाशित झाल्या आहेत.)
------------------------------------------------------------------------
34408, 34407

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top