
मुकादमवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा
वाल्हे, ता. ३१ : गेल्या आठवडेभरापासून वाल्हे परिसरामध्ये बिबट्या आल्याची चर्चा होती. गेल्या आठ दिवसांपासून भीतीच्या सावटाखाली असलेल्या वाल्हे हद्दीतील मुकदमवाडीत नुकताच बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला.
त्यानंतर गायब झालेला बिबट्या काल मुकादमवाडी येथील छगन आश्रु पवार यांना दिसला. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, सासवड व जेजुरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मुकादमवाडी येथे बिबट्याने वासरावर हल्ला केलेल्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मात्र, नुकताच बिबट्या पुन्हा एकदा दिसल्याने सरपंच अमोल खवले यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कळविल्यानंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी वनविभागाचे युवराज पाचर्णे यांनी सायंकाळी नागरिकांनी एकट्याने कोठेही फिरू नये, घर किंवा गोठ्यावर लाइट लावा, शक्यतो ग्रुपने बाहेर पडा, फटाके फोडा आदी सूचना देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. यावेळी वनरक्षक गोविंद निर्डे, अंकुश पवार, रामदास पवार, सुनील पवार आदि उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..