
पवना धरणग्रस्तांचा लढा सुरूच
आंबेठाण, ता. ६ : मावळ तालुक्यातील पवना धरणात जमिनी गेल्यानंतर प्रकल्पबाधित झालेल्या नागरिकांचे खेड तालुक्यात पुनर्वसन करण्यात आले. त्यापैकी अनेकांना फक्त निवासी भूखंड ताब्यात मिळाले पण त्याचा कागदोपत्री मालकी हक्क अजून काही मिळालेला नाही. शासनाने दिलेल्या जागेवरील मूळ मालकांचे अतिक्रमण काढावे आणि फाळणीबारा करून त्या जागेचा सातबारा प्रकल्पग्रस्तांच्या नावे मिळावा यासाठी आजही या प्रकल्पग्रस्तांचा लढा सुरूच आहे.
पवना धरणात जमिनी गेलेल्या २४ शेतकऱ्यांना खेड तालुक्यात वासुली गावच्या हद्दीत निवासी भूखंड देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. या वस्तीला नंतर भामचंद्रनगर असे नाव दिले गेले. १९६७मध्ये या कुटुंबांचे येथे पुनर्वसन झाल्यानंतर त्यांना निवासी भूखंड वाटप करण्यात आले. परंतु, फाळणीबारा झाला नसल्याने आजही त्या जागेवर मूळ मालकांचे अतिक्रमण आहे असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. एक पिढी गेली आता दुसऱ्या पिढीला तरी ही जागा ताब्यात मिळावी यासाठी येथील कुटुंबांचा संघर्ष आजतागायत सुरू आहे.
याबाबत येथील नागरिकांनी तहसीलदार कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, मंत्रालय आदी ठिकाणी आपली कैफियत मांडली आहे. परंतु, त्यांचा प्रश्न अजून काही सुटला नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे असून मूळ मालकाने येथे जवळपास एक एकर जागेवर अतिक्रमण केल्याचा येथील नागरिकांचा आरोप आहे. एमआयडीसी भागात हा परिसर येत असल्याने येथे जागेला मोलाची किंमत आलेली आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या जागेचा वाद सुरू आहे.
याबाबत नुकतेच चाकणचे मंडलाधिकारी गणेश सोमवंशी आणि त्यांच्या पथकाने जागेचा पंचनामा केला असून दोन्ही बाजूकडील लोकांना आपले लेखी म्हणणे मांडायला सांगितले आहे.
प्रकल्पबाधित नागरिकांनी कब्जे हक्काची रक्कम भरणे गरजेचे होते. त्याबाबत त्यांना जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी पत्र देखील दिलेले आहे. अतिक्रमण विषयाबाबत सरकारी मोजणी करून हद्द निश्चित झाल्यानंतर अतिक्रमण विषय मार्गी लागेल.
गणेश सोमवंशी, मंडलअधिकारी, चाकण.