प्रकल्पग्रस्तांवर रिंगरोडची टांगती तलवार

प्रकल्पग्रस्तांवर रिंगरोडची टांगती तलवार

Published on

आंबेठाण, ता.१० : जाधववाडी (ता.मावळ) येथील शेतकऱ्यांच्या जमिनी २० वर्षांपूर्वी धरणात गेल्या होत्या. त्यांचे पुनर्वसन येलवाडी (ता.खेड) येथे करण्यात आले होते. मात्र, आता येलवाडी येथील जागेतून रिंगरोड जात आहे. यासाठी पुन्हा जागा संपादित केली जात आहे. त्यामुळे आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी अवस्था प्रकल्पग्रस्तांची झाली आहे. परिणामी परवड झाल्याने नागरिकांनी रिंगरोडला कडाडून विरोध केला आहे.

रिंगरोडला विरोध करण्याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी नुकतेच चाकणचे मंडलाअधिकारी चेतन चासकर यांना देण्यात आले आहे. पुनर्वसन करण्यात आलेल्या गटातूनच ११० मीटर लांबीचा रिंगरोड जात आहे. एकदा पुनर्वसन झाल्याने पुन्हा आमचे पुनर्वसन नको, अशी मागणी करीत येथील ग्रामस्थांनी रिंगरोडला विरोध केला आहे.
याबाबत ग्रामस्थांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. चाकण मंडलाधिकारी चेतन चासकर, तलाठी विष्णू रूपनवर आणि भूकरमापक महेश जाधव यांनी जागेवर भेट दिली आहे.

बाधित शेतकऱ्यांना १९९९-२००० मध्ये येलवाडी येथे घरासाठी चार गुंठे देण्यात आली. यानंतर खातेदार शेतकऱ्यांना चार एकर जमीन मिळणार होती. परंतु अद्यापही ४ एकर जमीन प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना मिळाली नाही.

दरम्यान, निवेदन देताना पीएमआरडीचे सदस्य वसंत भसे, विष्णू जाधव, विनायक जाधव, मुरलीधर जाधव, बाळासाहेब जाधव, पांडुरंग बोत्रे, दत्ता बोत्रे, नामदेव जाधव, मयूर गावडे, तानाजी नाणेकर, किरण जाधव, रामदास भोसले, विलास जाधव, संतोष जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आम्ही जगावे की मरावे?
पुनर्वसन झालेल्या जागेत पुन्हा रिंगरोडसाठी जागा संपादित केल्या जात आहेत. या जागेत घरे, शाळा, पाण्याची टाकी, समाजमंदिर, मंदिर, क्रीडांगण सर्व पायाभूत सुविधा आहेत. पुन्हा पुनर्वसन होणार असल्याने ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. किती वेळा पुनर्वसन करणार आहात? असा सवाल उपस्थित करीत. आम्ही जगावे की मरावे? असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान, २० वर्षांपूर्वी विस्थापित झालेली जवळपास ४० कुटुंबे पुन्हा यामुळे विस्थापित होणार आहेत.

प्रकल्पबाधित शेतकऱ्यांच्या नशिबी पुन्हा पुनर्वसन पडल्याने त्याच्यावर मोठा अन्याय होत आहे. कायद्याने एकदा पुनर्वसन झाल्यावर पुन्हा त्याच लोकांचे पुनर्वसन करता येत नाही. हा त्यांच्यावर अन्याय आहे. याबाबत पुनर्वसित शेतकऱ्यांसाठी लढा उभारू.
- वसंत भसे पाटील, सदस्य, पीएमआरडीए


02698

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.