भामचंद्र डोंगर मार्ग कचऱ्याच्या विळख्यात
आंबेठाण, ता. १४ : तीर्थक्षेत्र भामचंद्र डोंगराकडे जाणाऱ्या वासुली फाटा ते भामचंद्र विद्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून त्याचा त्रास शालेय विद्यार्थी आणि कामगार यांना मोठ्या प्रमाणात होत आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक करीत आहेत.
वासुली फाटा (ता. खेड) येथून भामचंद्र डोंगराकडे जाता येते. मध्यंतरी भामचंद्र विद्यालय ही शिक्षण संस्था आहे. मात्र, या मार्गावर टेट्रापॅक कंपनीच्या परिसरात असणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा, बांधकामाचा राडारोडा, हॉटेलमधील पदार्थ, मृत कोंबड्या, केशकर्तनालयातील केस अशा प्रकारचा कचरा टाकला जातो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. भटकी कुत्री या भागात मोठ्या प्रमाणात वावरत आहेत. त्यांचाही त्रास विद्यार्थ्यांना आणि पायी ये- जा करणाऱ्या नागरिकांना होत आहे.
एमआयडीसी भागात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे तेथे निघणारी काळी माती, चिखल या ठिकाणी आणून टाकला जातो. त्यामुळे रस्त्याच्या कडेची गटारे पूर्णपणे भरून गेली असून, सिमेंट रस्त्याच्या साइडपट्टीलाच असा कचरा खाली केला जातो. त्यामुळे रस्त्याच्या साइडपट्ट्या पूर्णपणे बुजून गेले आहेत. थोडा जरी पाऊस झाला तरी येथे टाकण्यात आलेल्या काळ्या मातीचा चिखल होऊन रस्ता निसरडा होत आहे. परिणामी वाहने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन रात्रीच्या अंधारात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहे.