भांबोलीतील उद्योजकाचा आदर्श उपक्रम
आंबेठाण, ता. २६ : जे काम प्रशासनाचे आहे, ते काम करण्याची वेळ जर सर्वसामान्य नागरिकांवर येत असेल, तर प्रशासनासाठी ही लाजिरवाणी बाब आहे. असेच काम भांबोली (ता. खेड) येथे करण्यात आले आहे. युवा उद्योजक संदेश काळे यांनी प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा न ठेवता स्वखर्चाने रस्ता दुरुस्त केला आहे. त्यांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे.
येथील चाकण- वासुली फाटा रस्ता ते सुरीन कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जवळपास गुडघाभर खड्डे पडले होते. हाच रस्ता पुढे सावरदरी येथील ठाकरवस्त्यांना जातो. तसेच भांबोली आणि सावरदरी येथील शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा रस्ता आहे. याशिवाय या मार्गावर अनेक लहान-मोठ्या उद्योजकांनी आपले बस्तान बसविले आहे. मात्र, रस्त्याच्या या दुरवस्थेकडे प्रशासन ढुंकूनही पाहत नव्हते. यामुळे शेतकरी, स्थानिक नागरिक, कामगार, कंपन्यांमध्ये येणारी वाहने यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच, खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याचा फटका स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक यांना बसत होता. ही गंभीर बाब लक्षात घेता उद्योजक संदेश काळे यांनी स्वखर्चाने या ठिकाणी मुरूम टाकून आणि पुन्हा त्यावर रोलिंग करून हा रस्ता नागरिकांसाठी सुखकर केला आहे. याप्रसंगी संदेश काळे, मयूर काळे, रवींद्र शिळवणे, हृतिक बुट्टेपाटील, प्रशांत बुट्टेपाटील आदी उपस्थित होते.
उद्योजक संदेश काळे यांचे कौतुक
वर्दळीच्या रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी प्रशासनाच्या कुठल्याही सहकार्याची अपेक्षा काळे यांनी ठेवली नाही. या दुरुस्तीने स्थानिकांची गटाराच्या पाण्यापासून सुटका झाली असून, नागरिकांचा विशेषतः कामगारांचा प्रवास सुखकर झाला आहे. काळे यांनी केलेल्या या उपक्रमाचे स्थानिक नागरिकांसह कामगार आणि उद्योजक यांनी कौतुक केले आहे.
03432