चाकण एमआयडीसीला समस्यांचा विळखा

चाकण एमआयडीसीला समस्यांचा विळखा

Published on

आंबेठाण, ता. २५ : खेड तालुक्यात एमआयडीसीचे चार टप्पे पूर्ण झाले तर पाचवा टप्पा सुरू आहे. याशिवाय एक एसईझेड आणि पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचा एक प्रकल्प येथे झाला आहे. देशासह जगातील अनेक नामवंत कंपन्या तालुक्यात आल्या. यामुळे एमआयडीसीला पंचतारांकित एमआयडीसी म्हणून सुरुवातीला ओळखले जाऊ लागले. मात्र, एमआयडीसीमध्ये वाहतूक कोंडी, रस्ता, कचरा यांसह अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
चाकण एमआयडीसी, चाकण शहर आणि या एमआयडीसीला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांवर वाहतूक कोंडी नित्याची समस्या ठरत आहे. रखडलेल्या पुणे- नाशिक महामार्गाचे रुंदीकरण आणि नूतनीकरण, कित्येक वर्षांपासून रुंदीकरणाची फक्त चर्चा असलेल्या तळेगाव दाभाडे ते चाकण मार्गे शिक्रापूर रस्ता या कोंडीला जास्तीचे जबाबदार आहे. याशिवाय एमआयडीसी अंतर्गत तर रस्त्याची बहुतांश चाळण झाली आहे. काही वर्षांपूर्वी हायब्रीड ॲन्युइटी अंतर्गत एमआयडीसीला पूरक असणारे रस्ते केले. मात्र, एमआयडीसी अंतर्गत रस्ते मात्र दयनीय झाले आहेत. एमआयडीसी टप्पा क्रमांक दोनमधील कॉर्निंग कंपनीपर्यंत आलेला ७५ मीटर रुंदीचा रस्ता पुढे अद्यापही सुरू झाला नाही.
चाकण एमआयडीसी भागात कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची? ही मुख्य समस्या आहे. नागरी वसाहतीमधून निघणारा कचरा टाकायचा कुठे? आणि त्यावर प्रक्रिया होणार की नाही? याचे उत्तर इतक्या वर्षांनंतर देखील नागरिकांना मिळत नाही. बिरदवडी आणि खराबवाडी गावच्या शिवेवर असणाऱ्या खाणीत हा कचरा टाकला जातो किंवा तेथे जाळला जातो. नागरी वस्तीसह कारखान्यात निघालेला बहुतांश कचरा या ठिकाणी जाळला जातो, तर काही कचरा अनेक कारखानदार रात्रीच्या वेळी मोकळी जागा पाहून जाळून टाकतात.
पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलिस प्रशासन यासह स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्या निष्क्रीयपणामुळे एमआयडीसीतील बकालपणा वाढत चालला आहे. बेकायदा बांधकामावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. नव्याने केलेले रस्ते कारखानदार आणि स्थानिक नागरिक मनमानी प्रमाणे खोदत आहे. त्यामुळे रस्त्यावर गतिरोधक कमी पण खड्डे जास्त, असे चित्र पाहायला मिळत आहे.

गुंडगिरी आणि दहशतीचे वातावरण
एमआयडीसी भागात उद्योजकांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी आणि कामाचे ठेके मिळविले जात आहे. उद्योजक किंवा कंपनी अधिकारी यांना रस्त्यात अडविणे, शिवीगाळ करणे, मारहाण करणे ही देखील एमआयडीसीची मोठी समस्या होत चालली आहे. अलीकडच्या काळात तर कारखानदारांवर गोळ्या चालवून औद्योगिक वातावरण दूषित करण्याचे प्रकार वाढले आहे. अनेक ठिकाणी गावपुढारी कंपन्यांमध्ये ठेके मिळविण्यासाठी चुकीचे मार्ग अवलंबित असून, त्याला राजकीय पाठबळ मिळत आहे.

ठेकेदार गब्बर आणि अधिकाऱ्यांची चुप्पी
एमआयडीसीची अनेक कामे करणारे ठेकेदार कामे मिळवून गब्बर झाल्याचे दिसत आहे. अनेक शासकीय कामे घेतल्यानंतर ती पूर्ण न करता अर्धवट ठेवली जात आहे. कामे अर्धवट का ठेवली? हे विचारण्याचे धारिष्ट्य एमआयडीसी अधिकारी दाखवत नाही. याचा फायदा ठेकेदार घेत असून, एमआयडीसीची कामे म्हणजे फक्त मलई मिळविण्यासाठीच असतात, अशी त्यांची मानसिकता झालेली दिसत आहे.

कॉर्निंगपासून पुढे रखडलेल्या कामाची नव्याने निविदा प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांमुळे हे काम रखडले होते. पीएमआरडीएच्या रस्त्याला ७०० मीटर अलीकडे हा रस्ता जोडला जाईल. तसेच, एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्याची कामे संबंधित ठेकेदाराकडून तत्काळ केली जातील. तसेच, खराब रस्ते दुरुस्त केले जातील.
- प्रकाश भडंगे, उपअभियंता, एमआयडीसी

ज्या ठिकाणी असे बेकायदेशीर प्रकार सुरू असतील, त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही.
- दिगंबर सूर्यवंशी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म्हाळुंगे पोलिस ठाणे

03485

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com