आठशे मतांच्या वराळ्यात
पाच वेळा झेडपी सदस्य

आठशे मतांच्या वराळ्यात पाच वेळा झेडपी सदस्य

Published on

आंबेठाण, ता. १० : गावचं मतदान अवघं ८००, परंतु जिल्हा परिषदेचे प्रतिनिधित्व करण्याचे संधी मात्र तब्बल पाच वेळा मिळाली. हा इतिहास घडविला आहे खेड तालुक्यातील इवल्याशा वराळे गावाने.
वराळे गाव खेड तालुक्यातील अतिशय लहान गाव. गावची ग्रामपंचायत सदस्य संख्या सातच. गाव लहान असल्याने सन २००२पर्यंत या गावाला पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, शरद बुट्टे पाटील यांच्या राजकीय प्रवेशानंतर या गावाने राज्यात एक अनोखा इतिहास घडविला आहे. तब्बल २५ वर्षे हा गट आपल्या ताब्यात ठेवण्यात त्यांनी यश मिळविले आहे.
सन २००२मध्ये शरद बुट्टे पाटील यांच्या रूपाने भामा खोऱ्याला एक तरुण लोकप्रतिनिधी मिळाला. त्यावेळी मातब्बर अशा हिरामण राळे यांना पराभवाचा धक्का देत बुट्टे पाटील यांनी पहिला विजय संपादन केला. त्यानंतर सन २००७मध्ये झालेल्या जिल्हा परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शरद बुट्टे पाटील यांनी पुन्हा कैलास गाळव आणि रमेश राळे यांना पराभूत करीत सलग दुसरा विजय नोंदविला. त्यानंतर सन २०१२ला झालेल्या निवडणुकीत या गटातील जिल्हा परिषदेची जागा आरक्षित झाली. त्यावेळी वराळेची ठाकरवस्ती असलेल्या आदिवासी ठाकर समाजातील सुरेखा ज्ञानेश्वर ठाकर यांना बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य करून बुट्टे पाटील यांनी जिल्ह्यात इतिहास घडविला. त्यानंतर सन २०१७मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा कैलास गाळव आणि माणिक कदम यांना पराभूत करून बुट्टे पाटील यांनी पुन्हा जिल्हा परिषद गटावरील आपले वर्चस्व सिद्ध केले.
त्यानंतर तब्बल नऊ वर्षांनंतर झालेल्या आताच्या निवडणुकीत महिलेसाठी जागा आरक्षित झाल्यानंतर शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता यांनी आमदार बाबाजी काळे यांच्या भगिनी राजश्री जैद यांना पराभूत केले. या निवडणुकीत तालुक्यातील सर्वच पक्षांनी एकत्र येत बुट्टे पाटील यांच्या विरोधात मूठ बांधली होती. परंतु, निकालाने भामा खोरे हा शरद बुट्टे पाटील यांचा बालेकिल्ला आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com