अशोक पवारांची ढाल बनून उभी राहणार

अशोक पवारांची ढाल बनून उभी राहणार

आंधळगाव, ता. ११ : ‘‘लोकशाही पद्धतीने निवडून येणाऱ्या नीलेश लंके यांच्यासारख्या आमदाराला तुम्ही ‘किस झाड की पत्ती’ असं म्हणता, हे कितपत योग्य आहे? आमदार अशोक पवार यांच्याबद्दल कुणीही अपशब्द काढला असेल तर त्यांच्या बाजूने ढाल बनून मी कायम उभी राहील असा शब्द देते,’’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथे डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी आमदार अशोक पवार, विश्वास ढमढेरे, स्वप्नील गायकवाड, सुजाता पवार, ऋषिराज पवार, नरेंद्र माने, संभाजी फराटे, पोपट भुजबळ, सुभाष कळसकर, शिवाजी गदादे, उमेश साठे, महेश ढमढेरे, बाळासाहेब नरके, राजेंद्र नरवडे, पोपट शेलार, बाळासाहेब नागवडे, लतिका वराळे, दिलीप मोकाशी, दत्तात्रेय फराटे, कांतिलाल होळकर आदी उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, कांद्याचा भाव मिळण्यासाठी अमोल कोल्हे हे लोकसभेत सर्वांत जास्त लढले आहेत. सत्तेत सहभागी झालेले नेते कांद्याच्या बाजारभावाबाबत मात्र का बोलत नाहीत. ज्येष्ठ नेत्यांच्या निवृत्तीबाबत ते कायम बोलतात. मी या भागाचा विकास केला, असं ते नेहमी म्हणतात; मग शेतकऱ्याच्या दुधाला पन्नास रुपये लिटर भाव त्यांना का देता येत नाही? ’’
आमदार रोहित पवार म्हणाले, ‘‘काही नेते इथे येतात आणि बघतोच- करतोच, अशी भाषण करतात. कुणीही आमदार हा स्वाभिमानी नागरिकांमुळे होतो. नेते इथे येतील आणि बघतो करतो, असं म्हणतील, पण उद्याची लोकसभा निवडणूक होऊद्या ४ जूननंतर त्यांची पार्टी संपेल. त्यांनी दिलेली धमकी ही आमदार अशोक पवारांना नव्हती, तर येथील सर्वसामान्य जनतेला होती. अशोक पवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार आहोत. पैशाच्या बाबतीत ते मोठे नसतीलही, पण पवारसाहेबांवरील निष्ठा व प्रेम याबाबतीत ते नक्कीच मोठे आहेत. राज्यात येणारे सरकार आपलं असून, ते मंत्री होणार आहेत. पण त्यासाठी या निवडणुकीत अमोल कोल्हे यांना तालुक्यातून भरघोस मताधिक्य द्या.’’
यावेळी नवनाथ शिवले, खंडेराव फराटे, ऋषिराज पवार, सक्षणा सलगर, आमदार अशोक पवार आदींची भाषणे झाली. शंकर फराटे यांनी सूत्रसंचालन केले. दत्तात्रेय फराटे यांनी आभार मानले.

सहा महिन्यांपूर्वी अजित पवार हे ‘कारखाना माझ्याशिवाय चालू होऊ शकत नाही’ असं बोलले होते. परंतु, या तालुक्यातील ऊस आपल्या कारखान्याला नेऊन त्यांनी स्वार्थी राजकारण केले. भविष्यात घोडगंगा कारखान्याला लागेल ती सर्व मदत देऊन कारखाना लवकरच सुरू करू. मोदी सरकारच्या पायाखालची वाळू घसरल्याने ते पवारसाहेबांना व उद्धव ठाकरेंना ‘आमच्याकडे या’ असे म्हणत आहेत.
- रोहीत पवार, आमदार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com