मांडवगणच्या शाळेने घेतला मोकळा श्‍वास

मांडवगणच्या शाळेने घेतला मोकळा श्‍वास

Published on

मांडवगण फराटा, ता. २ : मांडवगण फराटा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारातील अतिक्रमणांवर पोलिस बंदोबस्तात गुरुवारी (ता. ३१) कारवाई करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश फराटे यांनी हे अतिक्रमण हटविण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता, तसेच ‘सकाळ’ने देखील सात जूनला या समस्‍येची दखल घेत बातमी प्रसिद्ध केली होती. या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
मांडवगण फराटा शाळेची ३७ गुंठे एवढी स्वमालकीची जागा आहे. २५ ते ३० वर्षांत या शाळेला अतिक्रमणांचा मोठा विळखा पडला होता. पुणे मॉडेल स्कूल अंतर्गत शाळेची निवड झाल्याने शाळेच्या विकासात अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीने ही अतिक्रमणे हटविण्यासाठी ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे मागणी केली होती. तीन नोटिसा पाठवूनही अतिक्रमणधारक त्याला दाद देत नव्हते. अतिक्रमणाच्या या समस्येबाबत ‘सकाळ’ने ‘मांडवगण शाळेला अतिक्रमणाचा विळखा’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अखेर शाळेच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी विष्णू गाडिलकर, शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ पवार, पोलिस उपनिरीक्षक हनुमंत नकाते, ग्रामसेवक राहुल बांदल यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी ११ वाजता अतिक्रमण कारवाईला सुरवात करण्यात आली. परंतु पंचायत समितीचे गटविकास अधिकारी महेश डोके यांनी या कारवाईबाबत आम्हाला आश्‍वासन दिले असून अगोदर त्यांच्याशी बोला आणि मगच कारवाई करा, असा पवित्रा अतिक्रमणधारकांनी घेत कारवाई काही वेळासाठी बंद पाडली. या वेळी पोलिस, ग्रामविकास अधिकारी यांच्याशीही व्यावसायिकांनी वाद घातला. अखेर सरपंच समीक्षा फराटे-कुरुमकर यांनी निर्णायक भूमिका घेत अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुपारी तीन वाजता पुन्हा कारवाईला सुरुवात झाली.
या कारवाईत जेसीबीच्या साहाय्याने तब्बल १९ व्यावसायिक अतिक्रमणे हटविण्यात आली. मात्र शाळेच्या अंगणात असलेली पाण्याची धोकादायक टाकी व सात घरकुले तशीच ठेवली आहे. शाळेच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविल्याने शाळेच्या विकासात येणारा अडथळा दूर झाल्याचे मत व्यक्त करत ग्रामस्थांसह पालकांनी आनंद केला, तसेच ‘सकाळ’ व शाळा व्यवस्थापन समितीचे आभार मानले.

गावाच्या विकासात अडचण निर्माण करणारी अतिक्रमणे आम्ही काढली आहेत. भविष्यातही गावातील अतिक्रमणांवर अशाच पद्धतीने कडक कारवाई करणार आहोत.
- समीक्षा फराटे-कुरुमकर, सरपंच, मांडवगण फराटा

पुणे स्कूल मॉडेलमध्ये या शाळेची निवड झाल्याने शाळेच्या विकासात बाधा निर्माण झाली होती. शाळेच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविणे गरजेचे झाले होते. त्यामुळे आम्ही सर्व प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच ही कारवाई केली आहे.
- बाळकृष्ण कळमकर, गटशिक्षण अधिकारी, शिरूर

शाळेच्या हद्दीतील अतिक्रमणे हटविल्याने शाळेच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. या कारवाईसाठी ग्रामस्थांतर्फे प्रशासनाचे आभार मानतो.
- योगेश फराटे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com