इनामगावात रात्रभर चोरट्यांचा धुमाकूळ

इनामगावात रात्रभर चोरट्यांचा धुमाकूळ

Published on

मांडवगण फराटा, ता. १६ : इनामगाव (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. १६) रात्रभर चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने अक्षरशः रात्र जागून काढण्याची वेळ नागरिकांवर आली. येथील तीन घरे फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला असून, ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला आहे. मात्र, घरासमोर लावलेली एक दुचाकी चोरट्यांनी लांबवली. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे परिसरातील महिला व ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पोलिस प्रशासन फक्त पंचनामा करून थांबत असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळुंजपट येथे सोमवारी रात्री १२ वाजता चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र, आवाज आल्याने जागे असलेल्या बारकू वाळुंज व तेजस सोमासे यांनी पाठलाग केल्याने चोरट्यांनी पळ काढला. त्यानंतर जितेंद्र मोकाशी यांच्या घराजवळ आणलेली दुचाकी टाकून चोरटे पसार झाले. मध्यरात्री दीडच्या सुमारास मुरलीधर कचरू लांडे यांचे घर फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, मात्र आवाजाने कुटुंबीय जागे झाल्याने चोरीचा प्रयत्न अयशस्वी झाला. तसेच त्यांच्या दुचाकीत इंधन नसल्याने तीही चोरटे नेऊ शकले नाहीत. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घाडगेमळा येथे हरिश्चंद्र भालेराव यांच्या बंद घरात हात साफ करण्याचा प्रयत्न केला, पण रिकाम्या हाताने त्यांना परतावे लागले. अखेरीस अक्षय घाडगे यांची दुचाकी घेऊन चोरटे पळाले.
दरम्यान, सकाळी मांडवगण फराटा दूरक्षेत्राच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जितेंद्र मोकाशी यांच्या घरासमोर टाकून दिलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले.

पोलिस असूनही चोरट्यांचा सुळसुळाट
गावात चोर आल्याचे नागरिकांनी कळविल्यानंतर पोलिसांची गाडी रात्री सव्वाबारा वाजता गावात पोहोचली. मात्र, तरीही पहाटे तीनपर्यंत चोरटे निर्धास्तपणे घरे फोडण्यात व्यस्त होते. त्यामुळे चोरट्यांना पोलिसांची भीती उरलेली नाही, असेच चित्र दिसून आले.

ग्रामसुरक्षा यंत्रणेची मागणी
शिरूर तालुक्यात वाढत्या चोरीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश दिले असतानाही ग्रामपंचायतीकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन वर्षांत अनेक चोरीच्या घटना होऊनही यंत्रणा सुरू न झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामसुरक्षा यंत्रणा त्वरित कार्यान्वित करावी, अशी मागणी अक्षय घाडगे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com