मांडवगण आरोग्य केंद्रात रुग्ण ताटकळले
मांडवगण फराटा, ता. २ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी (ता. १) सकाळी दहा वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ताटकळत बसावे लागले. काहींना अखेर खासगी दवाखान्यांकडे वळावे लागले. त्यामुळे सरकारी आरोग्य सेवेबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मांडवगण फराटा आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी व आठ कर्मचारी कार्यरत आहेत. डॉ. नितीन फटाले व डॉ. प्रतीक दिवेकर या वैद्यकीय अधिकाऱ्यांची केंद्रावर नेमणूक आहे. मात्र, शनिवारी सकाळी दोघांपैकी एकही डॉक्टर उपस्थित नव्हते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांना फोन केल्यानंतर अखेर सकाळी पावणेदहा वाजता डॉ. दिवेकर, तर पावणेअकरा वाजता डॉ. फटाले हे आरोग्य केंद्रात दाखल झाले.
या केंद्रावर शिरूरसह दौंड तालुक्यातील कानगाव, हातवळण आदी गावांतील रुग्ण आणि गर्भवतींची गर्दी असते. सकाळी ८.३० वाजता सुरू होणारी तपासणी पावणेदहा वाजल्यानंतरही सुरू न झाल्याने रुग्णांना प्रतीक्षा करावी लागली. ‘हा प्रकार नेहमीच घडतो,’ असा आरोप रुग्णांनी केला आहे.
आरोग्य केंद्रात सोमवार ते शुक्रवार सकाळी ८.३० ते १२.३० आणि दुपारी ४ ते ६ अशी तपासणीची वेळ आहे. शनिवारी सेवा सकाळी ८.३० ते दुपारी १ पर्यंत सुरू असते. मात्र, शनिवारी सकाळी दहा वाजेपर्यंत आरोग्य सेविका वगळता इतर काही कर्मचारी अनुपस्थित असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अनेक रुग्णांना बाहेर उभे राहून डॉक्टर येण्याची वाट पहावी लागली. शासनाने नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्रे उभारली आहेत. ‘आयुष्मान भारत’ व ‘महात्मा फुले जनआरोग्य योजना’मधून गरीब व गरजूंना उपचाराची सुविधा दिली जाते. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे या योजनांचा लाभ योग्य ठिकाणी पोहोचत नसल्याची ग्रामस्थांची खंत आहे. ग्रामस्थांनी यापूर्वीही जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, तसेच प्रशासनाकडे तक्रारी केल्या, तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे सरकारी यंत्रणेवरील विश्वास डळमळीत झाल्याचे नागरिक विठ्ठल फराटे यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेऊन जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध चौकशी करून शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.
‘मला फोन करू नका’
मांडवगण फराटा आरोग्य केंद्रातील डॉक्टरांच्या अनुपस्थितीबाबत ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांच्याशी संपर्क साधला असता, ‘मला फोन करू नका. डॉक्टरांना त्यांचे काम करू द्या. सतत दवाखान्याच्या बातम्या का लावता?’ असे उत्तर दिले.
मांडवगण फराटा येथील आरोग्य केंद्रात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नाही. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून आरोग्य सेवा सुरळीत ठेवावी.
- नीलेश कोंडे, ग्रामस्थ
शुक्रवारी रात्री प्रसूती केल्यानंतर मी आरामासाठी घरी गेलो होतो. सकाळी ८.३० वाजता तपासणीची वेळ असते. माझे सहकारी डॉ. प्रतीक दिवेकर उशिरा का आले, याबाबत मी माहिती घेतो.
- डॉ. नितीन फटाले, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, मांडवगण फराटा (ता. शिरूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

