शिरसगाव काटा परिसरातील सेवेला रिक्तपदांचे ‘ग्रहण’

शिरसगाव काटा परिसरातील सेवेला रिक्तपदांचे ‘ग्रहण’

Published on

आंधळगाव, ता.२१: शिरसगाव काटा (ता. शिरूर) येथील राज्यस्तरीय श्रेणी २ चा पशुवैद्यकीय दवाखाना मंजूर होऊन पाच वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अद्यापही दवाखान्यास कायमस्वरूपी इमारत न मिळाल्याने येथील कर्मचाऱ्यांना गावोगावी फिरून उपचार द्यावे लागत आहेत. शिरसगाव काटा, कोळगाव डोळस व धुमाळवाडी या तीन गावांचा समावेश असलेल्या या दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी व परिचर ही पदे रिक्त असल्याने पशुपालकांना दिली जाणारी सेवा ठप्प झाली आहे. अपुऱ्या सोयी-सुविधा आणि व्यवस्थेतील दिरंगाईमुळे या दवाखान्याच्या अडचणींना कायम ‘ग्रहण’ लागले आहे.


करडे येथील कामकाजाचा अतिरिक्त भार सांभाळत पशुधन पर्यवेक्षक रमेश बाचकर हेच सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र रिक्त पदे, ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात दिलेली स्वमालकीची इमारतही पूर्णपणे नादुरुस्त व मोडकळीला आल्याने दवाखाना प्रत्यक्षात बंदच आहे. त्यामुळे डॉक्टरांना शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर जाऊनच उपचार द्यावे लागत आहेत. परिणामी स्थानिक शेतकऱ्यांना वेळ आणि पैसा खर्च करून खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत असून, यातून मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.


प्रशासन, लोकप्रतिनिधींकडून डोळेझाक
दवाखान्यासाठी गावठाणात पाच गुंठे जागा देण्याचा प्रशासकीय पाठपुरावा ग्रामपंचायतीमार्फत केला आहे. मात्र, अनेक वेळच्या प्रस्तावांनंतरही प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून सातत्याने डोळेझाकच केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. स्थानिक नागरिक आणि पशुवैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनीही या स्थितीबाबत वारंवार लेखी निवेदने दिली असतानाही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने शेती व पशुधनावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्‍त होत आहे.


याची आहे गरज
- दवाखान्यासाठी नवीन इमारत आवश्यक
- दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना निवासस्थान
- दवाखान्यासाठी संरक्षण भिंत
- पशुधन विकास अधिकारी,परिचर आदी रिक्त पदे भरण्याची गरज
- दवाखान्यात आवश्यक साधन सामग्री आवश्यक
- एक्स-रे मशिनची आवश्यकता

पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी २) शिरसगाव काटा येथील इमारत सध्या बंद अवस्थेत असली, तरी शेतकऱ्यांना दवाखान्यातील सर्व आवश्यक सुविधा व औषधे नियमित उपलब्ध करून दिली जात आहेत. जंतनाशके, मिनरल मिक्सचर,चाटण, विटा आदी सामग्रीचा शेतकऱ्यांनी योग्य लाभ घ्यावा. दवाखान्यात उपलब्ध असलेल्या उच्च प्रतीच्या वीर्यमात्रांचा वापर करून माजावर आलेल्या जनावरांचे कृत्रिम रेतन करून घ्यावे. यामुळे संकरित गाईंपासून होणाऱ्या कालवडींचे दूध उत्पादन अधिक मिळते. शिरसगाव काटा येथे दवाखान्याची नवीन इमारत उभारण्यासाठी वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे,”
- रमेश बाचकर, पशुधन पर्यवेक्षक,
शिरसगाव काटा पशुवैद्यकीय दवाखाना (ता.शिरूर)

शिरसगाव काटा येथे पशुवैद्यकीय दवाखान्याची स्वतंत्र इमारत नसल्याने शेतकऱ्यांना मोठी गैरसोय भासत आहे. इमारतअभावी आणि अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे पशू उपचारांच्या कामाला वारंवार बाधा निर्माण होते. शासनाने तातडीने नवीन दवाखान्याची इमारत उभारून येथील रिक्त पदे भरावीत.
- नरेंद्र माने, संचालक, घोडगंगा कारखाना न्हावरे

दवाखान्यातील रिक्त पदे
पशुधन विकास अधिकारी - १
परिचर - १

परिसरातील पशुधन
गाई..........२२९७
म्हैस..........३५४
शेळी..........१६०९
मेंढी..........१८९५
-------------------------------------------
राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना शिरसगाव काटा
एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ ची स्थिती
कृत्रिम रेतन संख्या..........२१९
वंध्यत्व निर्मूलन संख्या........१४५
गर्भधारणा तपासणी...९४

लसीकरण
पीपीआर/इटी (मेंढी व शेळी)..........३४८०
लाळ्या खुरकत ..........२५५२
लंपी..........१७२०
घटसर्प...८५५
फऱ्या...९१

परिसरात आढळणारे पशुरोग
लंपी..........१०
थायलेरिया...०

वैरण बियाणे वितरण
मका, ज्वारीसाठी एकूण ५० अर्ज प्राप्त
चारा उत्पादन क्षेत्र (हेक्टर).......... ७८०
सिंचित ओलिताखाली क्षेत्र...... ११४०

वार्षिक चारा (टनांत)
हिरवा.......७५
वाळलेला.......११४०

02525

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com