

मांडवगण फराटा, ता. २९ : गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथील जुनी अंगणवाडी इमारत पूर्णतः जीर्ण झाल्याने सन २०१९-२०मध्ये नवीन अंगणवाडी इमारत बांधण्यात आली. मात्र, तब्बल सहा वर्षे उलटूनही या इमारतीचे अधिकृत हस्तांतर झालेले नसल्याने चिमुकल्या बालकांना जिल्हा परिषदेच्या जीर्ण अवस्थेतील शाळा इमारतीत जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. या प्रकारामुळे पालकांकडून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गणेगाव दुमाला येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प, शिरूर–१ अंतर्गत अंगणवाडी कार्यरत आहे. जुन्या अंगणवाडी इमारतीची दुरवस्था झाल्याने नवीन इमारतीला मंजुरी देण्यात आली होती. इमारतीचे काम पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद शाळेच्या खोलीत अंगणवाडी सुरू करण्यात आली. मात्र, नवीन इमारत पूर्ण होऊनही हस्तांतर न झाल्याने आजही चिमुकल्यांना त्याच जीर्ण शाळा इमारतीत बसवावे लागत आहे. सध्या ज्या इमारतीत अंगणवाडी भरते, त्या इमारतीला अनेक ठिकाणी मोठे तडे गेले असून छताचे पत्रे, भिंती व फरशा धोकादायक अवस्थेत आहेत. पावसाळ्यात गळती तर उन्हाळ्यात तीव्र उकाडा सहन करावा लागतो. कोणत्याही क्षणी अपघात घडण्याची भीती पालकांनी व्यक्त केली आहे. इमारतीची स्थिती पाहता जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पालकांचे म्हणणे आहे.
अंगणवाडीची इमारत असुरक्षित असल्याने अनेक पालकांनी पर्याय म्हणून खासगी शाळांचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र आहे. परिणामी, अंगणवाडीत शिकणाऱ्या चिमुकल्यांची संख्या नगण्य झाली असून, याचा फटका येत्या काळात जिल्हा परिषद शाळेतील प्रवेश संख्येलाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या परिसरात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणावर असल्याने अंगणवाडी सेविकांना जीव मुठीत धरून चिमुकल्यांना शिकवावे लागत आहे. त्यातच या जीर्ण इमारतीत उंदरांचा सुळसुळाट झाला असून, त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. उंदीर व घुशी शालेय साहित्य, पोषण आहाराचे धान्य, कागदपत्रे व इतर साहित्य कुरतडत असल्याने अंगणवाडीचे दैनंदिन कामकाज विस्कळित होत आहे. उंदरांपासून साहित्याचे संरक्षण करण्यासाठी अंगणवाडीतील सर्व डबे व साहित्याच्या पेट्यांवर दगड ठेवण्याची वेळ सेविकांवर आली आहे. अशा असुरक्षित, अस्वच्छ व आरोग्यदृष्ट्या धोकादायक परिस्थितीत लहान बालकांना बसवणे म्हणजे त्यांच्या जिवाशी खेळ असल्याची भावना पालकांमध्ये तीव्र आहे. चिमुकल्यांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता निर्माण झाली असून सर्पदंश किंवा संसर्गजन्य आजारांचा धोका नाकारता येत नाही, असेही पालकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, नवीन अंगणवाडी इमारत सर्व सुविधा असलेली असून ती वापरासाठी पूर्णतः तयार आहे. मात्र,केवळ प्रशासकीय कारणांमुळे हस्तांतर प्रक्रिया रखडली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
संबंधित विभागाने तातडीने हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करून नवीन अंगणवाडी सुरू करावी, अन्यथा ग्रामस्थ व पालक एकत्र येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
“गणेगाव दुमाला येथील अंगणवाडी इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, नवीन बांधलेल्या इमारतीला संरक्षक भिंत नसून बाजूला झाडेझुडपे असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव अद्याप हस्तांतर करण्यात आलेले नाही.”
-महेश डोके, गटविकास अधिकारी, पंचायत समिती शिरूर
“गणेगाव येथे अंगणवाडीची इमारत जिल्हा परिषद शाळेजवळ बांधणे गरजेचे होते. मात्र, घनदाट झाडे असलेल्या ठिकाणी इमारत बांधल्याने ती गेल्या सहा वर्षांपासून हस्तांतराच्या प्रतीक्षेत आहे. जीर्ण इमारतीमुळे जीवितहानी झाल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील.”
-नीलेश कोंडे, ग्रामस्थ, गणेगाव दुमाला (ता. शिरूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.