
आळंदीत जलपर्णी काढण्याचे काम सुरू
आळंदी, ता.१५ः डुडुळगाव ते आळंदी (ता. खेड) येथील नदीपात्रातील जलपर्णी पिंपरी महापालिका हद्दीतून आळंदी हद्दीत सोडून दिल्याचे वृत्त ''सकाळ''मध्ये प्रसिद्ध झाले होते. याची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे इंद्रायणी नदी पात्रातील जलपर्णी काढण्याचे काम दोन दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
नदीपात्रात पोकलेन मशिनच्या मदतीने सर्व जलपर्णी गोळा करून नदीकाठी जमा करण्यात येत आहे. महापालिका हद्दीत डुडुळगाव येथे काम करत असताना तेथील कर्मचारी मात्र जलपर्णी पुढे आळंदीच्या दिशेने लोटत होती. याबाबत आळंदी पालिका मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी डुडुळगावसोबत आळंदी पालिका हद्दीतील जलपर्णी काढण्याची विनंती केली होती. प्रत्यक्षात जलपर्णी लोटून दिल्यामुळे आळंदीतील नदीपात्रात जलपर्णी बेसुमार दिसत होती. याबाबत बातमी छापून आल्याने आळंदी हद्दीतील सिद्धबेट बंधारा, ज्ञानेश्वरी मंदिरालगतची संपूर्ण जलपर्णी काढण्याचे काम सध्या महापालिकेच्या माध्यमातून सुरळीत सुरू आहे. परिणामी गरूडस्तंभ ते सिद्धबेट बंधारा परिसरातील पात्र नितळ दिसू लागले आहे.
दरम्यान, जलपर्णी काढण्याचे काम करणारे कर्मचारी तसेच मजूर उद्धटपणा करीत आहेत. कुणी छायाचित्र काढण्यास गेले की, छायाचित्र काढू नका, असे आयुक्तांनी सांगितले आहे. अन्यथा आम्ही काम बंद करू, अशी अरेरावीची भाषा करीत आहेत. चालू काम सोडून हे लोक छायाचित्र कुणी का कशाकरिता काढले याचीच चौकशी करत असल्याचे चित्र आहे.
03136