
आळंदीत ‘एक गाव एक शिवजयंती’
आळंदी, ता. १७ ः शहरातील सर्व गणेश मंडळे, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि आळंदीकर ग्रामस्थ एकवटले असून ‘एक गाव एक शिवजयंती’ करण्याच्या निर्णयावर आळंदीकर ग्रामस्थांनी गुरुवारी (ता. १६) आळंदी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकित शिक्कामोर्तब केले.
याबाबत शहरातील तरूणांनी एकत्र येत हजेरी मारुती मंदिरात बुधवारी (ता. १५) बैठक घेऊन एकत्रित शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आळंदी पोलिसांच्यावतीने शांतता कमिटी आणि ग्रामस्थांची बैठक आळंदी पोलिस ठाण्यात काल झाली. या बैठकीस डी. डी. भोसले, प्रकाश कुऱ्हाडे, प्रशांत कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, सचिन गिलबिले, गोविंद कुऱ्हाडे, आशिष गोगावले, आनंद मुंगसे, अजित वडगावकर यांच्यासह विविध राजकीय पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. ‘एक गाव एक शिवजयंती’ कार्यक्रम राबविताना सकाळच्या सत्रात तुळापूर ते आळंदी अशी शिवज्योत आणून पालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक पूजा करण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. यामध्ये अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, फेटेधारी मावळे, नगारा, शालेय विद्यार्थ्यांचे बॅण्ड पथक, वारकरी विद्यार्थ्यांची दिंडी, ढोल ताशा यांचे नियोजन केले आहे. तर मिरवणुकीदरम्यान दांड पट्ट्यांचे प्रात्यक्षिकही केले जाणार आहे. फटाक्यांची आतषबाजी करत मिरवणूक चाकण ते पालिका चौकापर्यंत काढली जाणार आहे.