
आळंदीत मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक
आळंदी, ता. २० ः टाळमृदंगाचा गजर... ढालताशांचा दणदणाट...अन फटाक्यांची आतषबाजी....अशा उत्साही वातावरणात पारंपारिक पोशाख परिधान केलेल्या आळंदीकर शिवभक्तांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढून शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी केली. शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते.
शहरातील सर्व गणेश मंडळे, विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आणि आळंदीकर ग्रामस्थांनी एक गाव एक शिवजयंती साजरी केली. रविवारी (ता. १९) सकाळी तुळापूर ते आळंदी शिवज्योत आणून पालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पूजा केली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सजावट आणि अभिषेक करण्यात आला. विविध सामाजिक कार्यकर्ते आणि नगरपरिषदेच्या वतीने पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. दुपारी शिवभक्तांनी रक्तदान शिबिर राबविले. त्यानंतर सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, फेटेधारी मावळे, नगारा, ढोलताशांचा दणदणाट, अश्वांची फौज, शालेय विद्यार्थ्यांचे बॅण्ड पथक, वारकरी विद्यार्थ्यांची दिंडी अशा थाटात भव्य मिरवणूक काढण्यात आली.
चाकण चौकातून निघालेली मिरवणूक प्रदक्षिणा रस्त्याने पालिका चौकात आली. ठिकठिकाणी नागरिक मिरवणूक पाहण्यासाठी उभे होते. स्त्रिया पारंपारिक नऊवारी नेसून, तर पुरुष कुर्ता पायजमा, फेटे घालून मिरवणुकीत सामील झाले होते. मिरवणुकी दरम्यान दांड पट्ट्यांचे प्रात्यक्षिकही केले गेले. ज्ञानेश्वर विद्यालयाच्यावतीने लेझीम सादर करण्यात आले. दरम्यान शहरातील विविध शाळांमध्येही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली होती.