
आळंदी नगरपरिषदेसमोर आंदोलन
आळंदी, ता. १३ : आळंदी नगरपरिषदेसमोर रिपब्लिकन सेना, दलित पँथर, वंचित बहुजन आघाडी, सिद्धार्थ ग्रुप यांच्या माध्यमातून भाजी बाजाराची जागा बदलणे आणि अनुसूचित जाती वर्गाच्या वतन जमिनी पुन्हा ताब्यात मिळण्यासाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संघटनांचे पदाधिकारी, महिला यांनी आळंदी नगरपरिषद कार्यालयासमोरच ठिय्या मांडला. तसेच मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांना दिले. मागण्यांमध्ये प्रामुख्याने आळंदीतील ग्रामीण रुग्णालया शेजारील सध्या असलेली भाजी मंडई स्थलांतरित करावी. आळंदीतील स्मशानभूमी आणि विद्युत दाहिनी आरक्षित जागेवर त्वरित स्थलांतरित करावी. अन्यथा जागेच्या बदल्यात त्याचा मोबदला देण्यात यावा. मुख्याधिकारी केंद्रे यांनी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी केंद्रे यांनी मी नव्याने नियुक्त झालो आहे. कागदपत्रांची माहिती घेवुन पुढील कार्यवाहीसाठी प्रयत्न करेन, असे सांगितले.