तीर्थक्षेत्र विकासाला चालना आवश्यक

तीर्थक्षेत्र विकासाला चालना आवश्यक

आळंदी, ता. ३१ : ‘‘माऊलींचे समाधीस्थान असलेल्या आळंदीचा विकास होण्यासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आणखी चालना देणे आवश्यक आहे. आळंदीतील सिद्धबेट, दर्शनबारी आणि इंद्रायणी प्रदूषणाबाबत सरकारचे लक्ष वेधू. आगामी काळात सरकार आणि प्रशासकीय पातळीवर बैठक घेण्यात येईल असे आश्‍वासन विधान परिषदेच्या सभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी आळंदीत सोमवारी (ता. ३१) दिले.
अधिक मास आणि श्रावण महिन्याच्या निमित्ताने डॉ. गोऱ्हे आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी चर्चा केली. याप्रसंगी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, ज्ञानेश्वरी देत सन्मान केला.
गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘आळंदीला भामाआसखेडचे पाणी मिळावे यासाठी खेडचे माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे आणि मी प्रयत्न केले. विधानपरिषदेमध्ये या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. राज्य सरकारने ४७३ कोटी रुपयांचा निधी तिर्थक्षेत्र विकासासाठी खर्च केला. आळंदीचा विकास होण्यासाठी तिर्थक्षेत्र विकास आराखड्याला आणखी चालना देणे आवश्यक आहे. सध्याचे सरकारही विकासासाठीआग्रही आहे. आळंदीत दर्शनबारीचा प्रश्न प्रलंबित आहे. इतर सणांच्यावेळीही आळंदीत गर्दी असते. अशावेळी दर्शनबारीचा दीर्घकालीन उपयोग होणार आहे.’’
इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाबाबत राज्य सरकारने सातत्याने लक्ष घातले आहे. तरी येथे मैला विसर्जन होते. मैलावर प्रक्रिया करणारी आधुनिक सामग्री नसल्याने आर्थिक प्रावधान केंद्र आणि राज्य सरकारने केले पाहिजे. यापूर्वी सरकारने निधी दिला मात्र प्रदूषण रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. इंद्रायणी प्रदूषणाबाबत स्थानिक प्रशासनानेही लक्ष घालावे असेही गोऱ्हे म्हणाल्या.

स्वयंसेवेला महत्त्व द्या
मंदिरांचा विकास करताना स्वच्छता आणि स्वयंसेवेला महत्त्व देणे आवश्यक आहे. शेगाव संस्थानप्रमाणे येथे सुविधा कराव्यात. मंदिराचा विकास साधायचा असेल तर त्यामध्ये राजकारण यायलाच नको असे मत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com