मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन बारा तासातच फोल ठरले

मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन बारा तासातच फोल ठरले

Published on

आळंदी, ता. १ : माऊलींच्या पालखी प्रस्थानावेळी शनिवारी (ता.२९) इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांना दिले होते. इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे म्हटले होते. हे आश्वासन देऊन अवघे बारा तासही झाले नाहीत, तर पुन्हा एकदा इंद्रायणी नदी फेसाळू लागली. नदी प्रदूषण करणाऱ्या अज्ञात समाजकंटकांचा उपद्रव वाढला असताना प्रशासकीय यंत्रणा मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा प्रस्थान सोहळ्याला शनिवारी (ता.२९) राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावून माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. तब्बल दोन तासाहून अधिक वेळ आळंदीत घालवला. इंद्रायणी काठावरील दगडी घाटावर उभे राहत नदी प्रदूषणाची पाहणी केली. तेथील वारकऱ्यांशी संवाद साधला. इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी कटिबद्ध असून इंद्रायणी स्वच्छ करण्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. सोबत आठशे कोटींची तरतूद नदी सुधार योजनेसाठी ठेवल्याचा पुनर्रुचारही केला.

यापूर्वीही एका धार्मिक कार्यक्रमात आळंदीत आले असता, मुख्यमंत्री शिंदे यांनी इंद्रायणी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासन वारकऱ्यांच्या समक्ष दिले होते. यामुळे राज्याचे प्रमुखांची पाठ फिरताच नदी प्रदूषित होते, म्हणजे मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, पाहणी दौरा फार्स होता की काय? अशी चर्चा आळंदीकरामधे होत आहे. प्रदूषण करणारी अज्ञात शक्ती किती निर्ढावली. याचा प्रत्यय यानिमित्ताने वारकरी आणि आळंदीकरांना आला आहे. रविवारी (ता.३०) सकाळपासूनच इंद्रायणीच्या पाण्याला तवंग दिसून आला. फेसाळलेल्या इंद्रायणीतच अनेक वारकऱ्यांनी स्नान केले.

प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई होणार का?
आता आळंदीकर आणि वारकऱ्यांना माऊलींच्या साक्षीने दिलेल्या आश्वासनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पूर्तता करणार का? प्रदूषण करणाऱ्यांवर ठोस कारवाई होणार का?आणखी किती काळ लागणार? याची प्रतिक्षा आता वारकऱ्यांना आहे. इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळल्याने मुख्यमंत्र्यांसह पिंपरी महापालिका, नदी काठच्या नगरपालिका, राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ अशा प्रशासनाची पोलखोलच रविवारी इंद्रायणीच्या पाण्याची पाहून झालेली दिसत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.