आळंदीतील स्कायवॉक पूल अंधातरीच

आळंदीतील स्कायवॉक पूल अंधातरीच

Published on

आळंदी, ता. ११ : अनेक वर्षे आषाढी कार्तिकी वाऱ्यांमध्ये भाविकांना संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधी दर्शनासाठी इंद्रायणीवरून देऊळवाड्यात नेणारा भक्तीसोपान पूल आता नामशेष करावा लागत आहे. दुसरीकडे राज्य तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून कोट्यवधी रुपये खर्चून तिहेरी मार्गाचा इंद्रायणीवरील बहुचर्चित स्कायवॉकचे बांधकाम नव्वद टक्के पूर्ण झाले. मात्र, तो स्कायवॉक देऊळवाड्याला जोडला गेला नसल्याने तो अपूर्ण आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने भक्तीसोपान पुलाऐवजी स्कायवॉकला जोड देत लोखंडी स्वरूपात फॅब्रिकेटेड पुलाचे काम सुरू असून, तो दर्शनबारीसाठी उपयोगात आणला जात आहे. मात्र, हा पूल आठवडाभरात पूर्ण होईल की नाही, याबाबत शंका आहे.
प्रशासनाच्या आणि ठेकेदारांच्या बेपर्वाईमुळे इंद्रायणीकाठी घाटाचे विद्रुपीकरण झाले. आता वारकऱ्यांनी नगरप्रदक्षिणा करताना इंद्रायणीकाठी अनेक अडथळ्यांचा सामना, तसेच चिखल पार करून जावे लागणार असल्याचे चित्र सध्या इंद्रायणीकाठी पाहायला मिळत आहे. दोन आठवड्यांपूर्वी २७ मे रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी इंद्रायणीकाठी भेट दिली तेव्हा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून बांधलेला स्कायवॉक दर्शनबारीसाठी सध्यातरी उपयुक्त नसल्याचे, तसेच भक्ती सोपानपूलही दर्शनबारीसाठी सुरक्षित नसल्याचे आढळले. त्यांनी भक्तीसोपान पुलाचा वापर बंद करून तो पाडावा. तेथे नव्याने तात्पुरती सोय म्हणून पूल बांधण्याचे आदेश दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सध्या स्कायवॉक आणि भक्त पुंडलिक मंदिराला लागून लोखंडी फॅब्रिकेटेड पुलाचे काम सध्या सुरू आहे. त्यासाठी नदीकाठी खोदकाम सुरू आहे. तकलादू स्वरूपात सध्या पुलासाठी स्टील वापरले जात आहे. स्कायवॉकला जोड देऊन फॅब्रिकेटेड पूल थेट माउलींच्या समाधी मंदिराला दर्शनबारी म्हणून जोडला जाणार आहे. फॅब्रिकेटेड स्वरूपात बांधला जात असलेला पुलाचे काम सोमवारपर्यंत (ता. १६) उरकणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता इतक्या कमी वेळेत पुलाचे काम पूर्ण होणे शक्य नसल्याचे चित्र आहे. सध्या तिन्ही पुलांभोवती विविध स्वरूपाच्या बांधकामामुळे चिखलाचा राडारोडा पडलेला आहे. अनेक ठिकाणी मोठाले खड्डे पडलेले आहेत. गटारे उघड्या स्वरूपात आहेत. एकंदर आषाढी वारीसाठी राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांना प्रदक्षिणा करताना चिखल, खड्डे आणि उघड्या गटारांबरोबर दगडगोट्यांचे दिव्य पार पाडून पुढे जावे लागणार आहे.

रखडलेली कामे
स्कायवॉक, फॅब्रिकेटेड पूल, सांडपाणी वाहून नेणारी गटारयोजना ही कामे सध्या रखडल्याने इंद्रायणीकाठी दुरवस्था दिसून येते. स्कायवॉक बांधायला आठ दहा वर्षे लागली. एका ठेकेदाराने तर परवडत नाही म्हणून गाशाही गुंडाळला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली काम सुरू आहे. सध्या बहुतांश काम पूर्ण झाले तरी भाविकांना उपयोगी ठरणारा नाही. कारण मंदिरापर्यंतचे जोड बांधकाम रखडले आहे. नमामी चंद्रभागा योजनेतील तीन कोटी आठ लाखांचे घाट दुरुस्तीचे आणखी एक काम सुरू असून, तेही दहा दिवसांत पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून एसटीपीसाठीचे अकरा कोटींतून सुरू असलेले बंदिस्त गटाराचे कामही प्रलंबित आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आळंदी इंद्रायणी घाटाची पाहणी केली, त्यावेळी सध्याच्या भक्ती सोपान पूल आणि स्काय वॉक वारी काळात दर्शनबारीसाठी उपयुक्त नसल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी भक्ती सोपान पुलाला जरूर फॅब्रिकेटेड पूल बांधण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देत १६ जूनपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान सदरचे काम प्रगतिपथावर असून १६ जूनपर्यंत प्रस्थानासाठी दर्शन बारी तयार असेल, अशी अपेक्षा आहे.
- माधव खांडेकर, मुख्याधिकारी, आळंदी नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com