माउलींच्या जन्मतिथीला राज्यभर आनंदोत्सव
माउलींच्या जन्मतिथीला राज्यभर आनंदोत्सव
पंधरा ऑगस्टला गावोगावी पालखी मिरवणुका; स्थानिक स्वराज्य संस्थांना परिपत्रक
आळंदी, ता. ३१ : संत ज्ञानेश्वर महाराज यांचा सप्तसतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव १५ ऑगस्ट रोजी गोकुळाष्टमीला राज्यभरात साजरा केला जाणार आहे. याचे नियोजन सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने बुधवारी (ता.३०) जारी केले. यात प्रामुख्याने १५ ऑगस्टला सायंकाळी पाच ते सात या वेळेत माउलींची प्रतिमा अथवा मूर्ती पालखीत ठेऊन मिरवणूक काढली जाणार आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांचे यंदा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मवर्ष आहे. त्यामुळे आळंदी देवस्थानच्या वतीने विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत. यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सोहळे, कीर्तन महोत्सवही होत आहेत. देवस्थानच्या वतीने नव्याने चांदीची पालखी साकारण्यात आली आहे. समाधी मंदिराचा दरवाजा चांदीचा मुलामा देऊन तयार केला आहे. तसेच साधून समाधी मंदिरासाठी अकरा किलो सोन्याचा कळस साकारला जात आहे. पंधरा ऑगस्ट रोजी सोन्याचा कळस मंदिरावर चढविण्यात येणार आहे. कृष्ण जन्माष्टमी आणि माउलींच्या जन्माची तिथी एकच आहे. त्यामुळे हा दिवस राज्याचा उत्सव साजरा व्हावा, अशी मागणी आळंदी देवस्थान विश्वस्त मंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत फडणवीस यांनी सोमवारी (ता. २८) नगरविकास विभागाला सूचना दिल्या.
यात राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद यांनी १५ ऑगस्टला सायंकाळी माउलींची पालखी मिरवणूक आयोजित करण्याचे सांगण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचे आळंदीकरांनी स्वागत केले आहे.
‘भाविकांनी सहभागी व्हावे’
संत ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा जन्मोत्सव सोहळा देवस्थानच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आळंदीत साजरा झाला. समाधी मंदिरावर १५ ऑगस्टला सोन्याचा कळस बसविण्यात येणार आहे. या दिवशी सर्व गावे, शहरे, महानगरांमध्ये माउलींची मिरवणूक काढावी. नागरिकांनी या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.