आळंदीत ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियान

आळंदीत ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियान

Published on

आळंदी, ता. १३ : ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियानांतर्गत आळंदी नगरपरिषदेने विविध शाळांमध्ये तिरंगा राखी, तिरंगा रांगोळी स्पर्धा, माझे संविधान निबंध स्पर्धा, समूह गीत गायन स्पर्धा उपक्रम राबवीत नागरिकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागृती निर्माण केली. या चारही उपक्रमासाठी आळंदी (ता. खेड) शहरातून विद्यार्थी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्याची माहिती आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
गुरुवारी (ता. ७) आळंदी नगरपरिषद शिक्षण विभाग शाळा क्रमांक दोन शाळा क्रमांक चार या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय अभिमानाची भावना, स्वच्छतेचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी जनजागृती करण्यात आली. तसेच, तिरंगा राखी उपक्रमामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि बचत गट महिलांनी सहभाग घेतला. आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक ते तीनमध्ये शनिवारी (ता. ८) चित्रकला, तिरंगा राखी, तिरंगा रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये १७३३ विद्यार्थी, ३५ बचत गटाच्या महिला, ५५ शिक्षक आणि ३८ नागरिकांनी सहभाग घेतला. आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक चारमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त सोमवारी (ता. ११) हस्ताक्षर व माझे संविधान या विषयावर स्पर्धेचे आयोजन केले होते. या उपक्रमात १६८९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक एक ते चारमध्ये मंगळवारी (ता. १२) समूहगीत गायन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या उपक्रमात १७०६ विद्यार्थी, ५० बचत गटाच्या महिला, ६० शिक्षक आणि ४५ नागरिकांनी सहभाग नोंदविला.

Marathi News Esakal
www.esakal.com