चोरी गेलेली मोटार आरोपीसह जप्त
आळंदी, ता. १० : चिंबळी (ता.खेड) येथून तीन दिवसांपूर्वी चोरी गेलेली मोटार आळंदी पोलिसांनी आरोपीसह जप्त केली. चिंबळी गावातील सीसी टीव्ही कॅमेरा तपासून आरोपीचा मग काढला. अखेर मोशी (ता. हवेली) येथील स्वप्नपूर्ती इमारतीजवळ मोटार आणि आरोपी अजय बाबू शेळके, (वय ३३ वर्ष रा. डोंगरे वस्ती, मोई रोड, ता. खेड) याला मंगळवारी (ता. ९) ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असल्याची माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.
आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ७) मध्यरात्रीच्या सुमारास चिंबळी येथून फिर्यादी आदित्य जैद यांच्या राहत्या घरासमोरून त्यांची मारुती सुझुकी कंपनीची फ्रंक्स (MH १४ LP ७४२७) ही मोटार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. याबाबत नरके यांनी आळंदी पोलिस ठाणे येथे तक्रार दिली होती. त्यानंतर गाडी आणि आरोपीचा मग काढण्यासाठी पोलिसांचे पथक तयार केले. त्यानंतर अजय बाबू शेळके या आरोपीचा माग घेऊन त्याद्वारे आरोपीपर्यंत पोचले व आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याजवळील मोबाईलवरील वेळ ठिकाण व इतर तांत्रिक तपास केला. यावेळी गुन्हा शेळके यानेच केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.