आळंदीत नगरप्रदक्षिणा मार्गावर अतिक्रमण
आळंदी, ता. ७ : तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून विविध ठिकाणी शहरात भूसंपादन करून पदपथ तयार केले. आषाढ, कार्तिक वारी तसेच दैनंदिन स्वरूपात वारकऱ्यांना नगर प्रदक्षिणा करण्यासाठी स्वतंत्र जागा असावी या हेतूने हा पदपथ तयार केला. मात्र नगरपरिषदेच्या आरोग्य आणि अतिक्रमण विरोधी विभागाच्या दुर्लक्षामुळे पदपथावर अतिक्रमण, भंगार व्यावसायिकांचा राडारोडा तसेच काही ठिकाणी खुरटे गवत वाढल्याने अस्वच्छता दिसून येत आहे. अतिक्रमणविरोधी पथक कारवाई आणि पदपथांची स्वच्छता कधी होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
राज्यातील विकास आराखड्याच्या माध्यमातून आळंदी शहरात रस्ता रुंदीकरणाबरोबरच प्रदक्षिणा रस्त्याच्या दोन्ही बाजूला तसेच शहरातील अन्य रस्त्यांवरही दुहेरी बाजूने पदपथ निर्मिती केली. यासाठी लाखो रुपयांचा खर्च राज्य शासनाच्या निधीतून झाला. उद्देश हाच होता की वर्दळीतून चालण्यासाठी वारकऱ्यांना स्वतंत्र मार्ग असावा. आता मात्र प्रदक्षिणा रस्त्यावर ठिकठिकाणी खासगी दुकानदारांचे जाहिरातीचे फलक उभे आहेत. मरकळ चौक, नगरपरिषद चौकातील पदापथांवर व्यावसायिकांनी पथारी मांडून दुकाने थाटली. काहींनी हातगाड्या लावल्या. केळगाव आळंदी रस्त्यावर तसेच चाकण आळंदी रस्त्यावरील पदपथावर भंगार व्यावसायिकांच्या वस्तू पडलेल्या आहेत. अस्वच्छता आणि खुरटी गवत या ठिकाणी वाढलेले दिसून येत आहे. वडगाव रस्त्याला आणि देहू फाटा येथे अपूर्ण परिस्थितीत पदपथांचे काम झाले आहे. अशा पदपथांवर हातगाड्या आणि दुकानांचे अतिक्रमण देहू फाटा भागात दिसून येते. पुणे आळंदी चाकण मार्गावरील देहू फाटा ते नवीन पूल भागामध्ये फुटपाथ नावालाच आहे. त्या ठिकाणी दुकानदारांच्या चार चाकी गाड्या उभ्या असतात. मरकळ रस्त्याला दोन्ही बाजूने हातगाड्यांचे अतिक्रमण दिसून येते. या ठिकाणी पदपथाच्या बाजूला असलेल्या दुकानदाराने स्वतःची दुकाने पदपथावर थाटली. काहींनी पदपथाच्या जागा भाड्याने देऊन हातगाड्या उभारल्या. नगरपरिषद चौकामध्ये फक्त बाजूला हातगाड्या आणि काही पथारीवाले असल्यामुळे पीएमपी बस थांब्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना, वारकऱ्यांना दैनंदिन या पद पथाचा वापर करता येत नसल्याचे चित्र आहे.
अवघ्या आठवड्यावर कार्तिकी येऊन ठेपली. पदपथाची स्वच्छता अद्याप झालेली नाही, तसेच अतिक्रमणही काढलेले नाही. वर्षभर तर अतिक्रमण असतेच किमान वारी काळात तरी इथली स्वच्छता आणि अतिक्रमण कारवाई करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

