अखंडीत वीज पुरवठ्याची तयारी

अखंडीत वीज पुरवठ्याची तयारी

Published on

आळंदी, ता. ७ : ‘‘संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या संजीवन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या कार्तिक वारीत वारकऱ्यांना २४ तास अखंडित वीज पुरवठा करण्यात येणार आहे,’’ असे वीज मंडळाचे कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.
यात्रा कालावधीमध्ये अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सध्या वीज मंडळाच्या वतीने विद्युत देखभाल आणि दुरुस्तीची कामे युद्ध पातळीवर सुरू केलेली आहेत. यात्रा कालावधीसाठी मरकळ आणि भोसरी उपकेंद्रातून वीज पुरवठा करण्यात येणार असून २२ केव्हीचे रोहित्र बसविण्यात आले आहे. यात्रेत गर्दीच्या दिवशी काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या वाहिनीचा पर्यायी वापर करता येणार आहे. मंदिर परिसरामध्ये दोन रोहित्रावरून विद्युत पुरवठा केलेला आहे. माउली मंदिरासाठी स्वतंत्रपणे नवीन २०० केव्ही क्षमतेचे रोहित्र बसविले आहे. गर्दीच्या ठिकाणी सर्व रोहित्रांना सुरक्षेच्या दृष्टीने एफआरपी फेसिंग बसविण्यात आले आहे. सर्व विद्युत वाहिन्यांच्या तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत.
याचबरोबर देहू फाटा चाकण रस्ता वडगाव रस्ता या ठिकाणी जादा क्षमतेचे रोहित्र बसवले आहेत. शहरातील पंधरा रोहित्राची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. कंपनीचे ४० कर्मचारी अखंड सेवा देण्यास वारी काळात सज्ज असणार असल्याचे विविध मंडळातील कनिष्ठ अभियंता संदीप पाटील यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांचे नियोजन
कार्तिक वारी काळात सहाय्यक अभियंता कार्यालय आणि जादाचे ३० कर्मचारी सातत्याने काम करतील. यामध्ये यात्रा नियोजन फिरत्या पथकासाठी दोन कर्मचारी, विजय भार तपासणी कक्षासाठी दोन कर्मचारी, माउली फिटर देखभालीसाठी दोनजण, मंदिरातील वीज तक्रारी निवारण करणे आणि आवश्यकता भासल्यास दुरुस्ती करण्यासाठी दोन कर्मचारी, जलाराम मंदिर, दत्त मंदिर या भागातील वीज तक्रार निवारण करण्यासाठी तीन कर्मचारी, नियंत्रण कक्षात तक्रार निवारणासाठी नगरपालिका आणि पोलिस नियंत्रण कक्षामध्ये दोन कर्मचारी राहतील. इंद्रायणी पार्क वडगाव रस्ता पद्मावती रस्ता आणि झाडी बाजार माउली मंदिर गोपाळपुरा चाकण रस्ता तसेच घेऊ फाटा इंदिरानगर मोशी रस्ता या ठिकाणी तक्रार निवारणासाठी सहा कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

प्रदक्षिणा मार्गावर भूमिगत वाहिनी
प्रदक्षिणा मार्गावर भूमिगत वाहिनी केलेली आहे. रथयात्रा तसेच अन्य काही वाहने जात असल्याने सर्व वीज वाहून नेणाऱ्या तारांची भूमिगत वाहिनी केली आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता कमी आहे. यात्रा काळात मध्येच वीज गेली अथवा अपघात झाल्यास नागरिकांनी तात्काळ वीज कर्मचाऱ्यांशी दूरध्वनी संपर्क साधावा.

दृष्टिक्षेपात
- हॉटेल, इतर व्यावसायिकांनी चोरून वीज जोड न वापरता अधिकृतपणे वीज जोड घ्यावा. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल.
- कोणी अनधिकृत वीजजोड वापरत असल्यास ही बाब महावितरणच्या लक्षात आणून द्यावी.
- यात्रा काळात तात्पुरत्या दुकानदारांना घरगुती मीटर वरून परस्पर वायरद्वारे वीज जोड देऊ नये.
- अधिकृतपणे मीटर घेण्यासाठी वारी काळातील दुकानदारांसाठी दोन हजार रुपयांत वीज मीटर दिले जाणार आहेत.
- मीटरचा वापर किती युनिटचा होणार यावर त्याचे डिपॉझिट अवलंबून राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com