

लालपरी खिळखिळी
आळंदी, ता. ९ : प्रवाशांना बसायला शेड नाही, आगाराच्या जागेत कचरा डेपो, सांडपाण्याचा निचरा, चालक वाहकांना बसायला जागा नाही, खासगी ट्रॅव्हल्स गाड्यांचा सुळसुळाट, एसटीला उभी करण्यास स्वच्छ जागा नाही, अशा विविध समस्यांनी आळंदी आगार ग्रस्त आहे.
आगाराला एसटी महामंडळाची साडेपाच एकराहून अधिक जागा मध्यवर्ती ठिकाणी असूनही केवळ राजकीय पुढारी, महामंडळाचे अधिकारी यांच्या अनास्थेमुळे ही जागा वापराविना पडून आहे. चारच गाड्या आळंदीतून निघतात. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असूनही मोक्याची जागा वापराविना पडून राहिल्याने आळंदी एसटी स्थानक अतिक्रमणाच्या विळख्यात पडले आहे.
आळंदीत वर्ष १९९०-९२ मध्ये पीएमटी सुरू झाली आणि एसटीला घरघर लागली. त्यानंतर एसटी बंद पडली आणि एवढी मोठी जागा वापराविना पडून राहिली. एसटी म्हणजे शाळकरी विद्यार्थी, कामगार वर्गाचा प्रवास सुखकर करणारी हमखास गाडी होती. आजूबाजूचे लोक इमारतीचा राडारोडा, कचरा इथे फेकत आहेत. काहींना तर सांडपाणी सोडल्याने हे गटारच आहे की काय? असे वाटते.
सध्या आळंदीमधून मराठवाड्यामध्ये कंधार आणि गंगाखेड, धारूर या ठिकाणी गाड्या जातात, तर पंढरपूर- मंगळवेढा ही एक एसटी सुरू आहे. मुंबईला सुरू केलेली एसटी जेमतेम तीन- चार महिने चालली नंतर ती बंद पडली. मुक्कामी येणाऱ्या गाड्यांचे चालक वाहकांच्या मुक्कामाची सोय नाही. एवढेच काय दिवसा बसण्यासाठीही जागा नाही. जे शेड आहे ते वर्षानुवर्षे बंद पडल्याने त्यामध्ये भिकारी आणि मद्यपी झोपलेले असतात. पंढरपूरच्या धर्तीवर आळंदीचे एसटी आगार सुधारता आले असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
विकासकाम फक्त कागदावरच
आळंदीतील एसटी स्थानकाची साडेपाच एकर जागा आहे. त्यापैकी काही ६० मीटर रुंदीकरणामध्ये जाते. चार एकरमध्ये राज्यतीर्थ विकास आराखड्याच्या माध्यमातून एसटी स्थानक दोन एकरामध्ये आणि उर्वरित दोन एकरमध्ये बहुमजली वाहनतळ करण्याचा मानस राज्य शासनाचा आहे. एसटी महामंडळाचा ना हरकत दाखलाही घेण्यात आला आहे. एसटी महामंडळाला हे स्थानक विकसित करून द्यायचे आहे. या ठिकाणी फलाट आणि प्रवाशांना बसण्याची सोय केली जाणार आहे. तर बहुमजली वाहनतळामध्ये सुमारे एक हजार वाहने उभी राहतील, एवढी क्षमता निर्माण केली जाणार आहे. यासाठी ५० कोटी रुपये निधी राज्यतीर्थ विकास आराखड्यातून टाकला आहे. सध्या हे काम फक्त कागदावरच आहे.
दृष्टीक्षेपात
१) आळंदी आगार : साडेपाच एकर जागा कंधार, मंगळवेढा, गंगाखेड, धारूर चार गाड्या, बसायला शेड नाही.
२) हे केले तर एसटी जोरात चालेल : आळंदीजवळ चाकण, वल्लभनगर आणि शिवाजीनगर आगार यांची सध्याची जागा अपुरी आहे आणि गाड्यांचा ताण जास्त आहे. तीनही आगारात मुक्कामी असणाऱ्या गाड्या आळंदीला मुक्कामासाठी आणल्या, तर वारकरी प्रवासी यांची चांगली सोय होईल.
३) एसटी आगाराच्या जागेत सध्या खासगी ट्रॅव्हल्सवाले गाड्या उभ्या करतात. खासकरून मराठवाड्याकडे जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त आहे.
४) राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असल्याने सध्या केवळ पंढरपूरला जाणारी एकच गाडी इथून जाते. राज्यातील कोल्हापूर, नरसोबाची वाडी, त्रंबकेश्वर, नांदेड, शिर्डी, शेगाव यांसारख्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या गाड्या आळंदीतून सुरू केल्या तर एसटी फायद्यात राहील.
06645
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.