अलंकापुरी वैष्णवांनी गजबजली

अलंकापुरी वैष्णवांनी गजबजली

Published on

आळंदी, ता. ११ : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिन सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या आळंदीतील कार्तिकी वारीस बुधवारी (ता. १२) गुरू हैबतबाबांच्या पायरी पूजनाने देऊळ वाड्याच्या महाद्वारात प्रारंभ होईल. दरम्यान, अलंकापुरी वैष्णवांनी गजबजली आहे.
कार्तिक वद्य अष्टमी ते अमावस्येपर्यंत कार्तिकी वारी सोहळा रंगणार आहे. या वारीला हजेरी लावण्यासाठी राज्यभरातून वारकरी दोन दिवसांपासूनच दाखल होऊ लागले आहेत. जागोजागी राहुट्या तंबू धर्मशाळांमध्ये हरिनामाचा गजर सुरू आहे. बुधवारी (ता. १२) पवमान अभिषेक दुधारती झाल्यानंतर भाविकांच्या महापूजा माऊलींच्या चांदीच्या चल पादुकांवर होतील. सात ते नऊ या वेळेत देऊळ वाड्याच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबांच्या पायरीपूजनाने सोहळ्याचा प्रारंभ होईल. पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफळकर राजाभाऊ आरफळकर प्रमुख विश्वस्त योगी निरंजनाथ ॲड. राजेंद्र उमाप, डॉ. भावार्थ देखणे, चैतन्य महाराज कबीर, ॲड. रोहिणी पवार, पुरुषोत्तम महाराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती यावेळी राहील. दरम्यान, सायंकाळी साडेसहाला वीणा मंडपामध्ये योगीराज ठाकूर यांच्या वतीने मानाची कीर्तन होईल. रात्री नऊ ते अकरा बाबासाहेब आजरेकर यांच्या वतीने कीर्तन सेवा होईल. दहा ते बारा हैबतबाबांच्या पायरी पुढे वासकर महाराजांच्या वतीने त्यानंतर बारा ते दोन मारुतीबुवा कराडकर आणि दोन नंतर आरफळकरांच्या वतीने जागरचा कार्यक्रम होईल. कार्तिक वद्य नवमी आणि दशमीला नेहमीप्रमाणे पवमान पूजा आणि कीर्तनाचे कार्यक्रम होतील.

शनिवारी मुख्य कार्तिकी एकादशी सोहळा
मुख्य कार्तिकी एकादशीचा सोहळा शनिवारी (ता. १५) असून पवमान अभिषेक महापूजा मध्यरात्री १२ नंतर सुरू होईल. दुपारी एक वाजता माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणासाठी बाहेर पडेल आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर सायंकाळी पुन्हा मंदिरात प्रवेश करेल. एकादशीला भाविकांच्या चलपादुकांवरील पूजा बंद राहतील. तर द्वादशीला रविवारी(ता. १६) सायंकाळी रथोत्सवाचा कार्यक्रम आणि सोमवारी(ता. १७) संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी दिन निमित्त मुख्य कार्यक्रम असून संत नामदेवांचे वंशज यांच्या वतीने मानाचे कीर्तन होईल.

पंढरपूरहून आल्या दिंड्या
आळंदीहून पंढरपूरला गेलेल्या गुरू हैबत बाबा दिंडी पंढरपूरवरून पुन्हा परतली असून मंदिरात प्रदक्षिणा करून हैबतबाबा ओवरी पुढे आरती करण्यात आली. याचबरोबर पंढरपुरातील अनेक फडकरी दिंड्या पंढरपुरातून आळंदीत आल्या. यामध्ये वासकर महाराज दिंडी, देहूकर दिंडी, शिरवळकर महाराज दिंडी, राजूरकर दिंडी यांचे आगमन झाले.

06673

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com