आळंदीत कोंडला ‘इंद्रायणी’चा श्वास
आळंदी, ता. २० : पिंपरी- चिंचवड महानगरपालिका हद्दीतून सोडण्यात येणाऱ्या मैलायुक्त आणि रसायनयुक्त सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदीपात्र फेसाळले आहे. उद्योग नगरीतील लोकांकडून प्रदूषणाची पातळी ओलांडली असून, इंद्रायणीचा गळा घोटल्याचे चित्र सध्या आळंदी (ता. खेड) येथे पाहायला मिळत आहे.
इंद्रायणी नदी म्हणजे प्रदूषण करण्यासाठी, सांडपाणी, रसायनयुक्त पाणी सोडण्यासाठी हक्काचे ठिकाण, अशीच भावना काही उद्योजक, तसेच महापालिका हद्दीतील प्रशासनाकडून होत असल्याचे चित्र आहे. महानगरपालिका हद्दीतील चिखली, कुदळवाडी, तळवडे, तसेच देहू, इंदोरी, तळेगाव भागातील औद्योगिक परिसरातून छोट्या- मोठ्या शहरांचे सांडपाणी सध्या इंद्रायणीमध्ये सोडले जात आहे. एसटीपी प्रकल्प हा निव्वळ खर्च करण्यासाठी आणि एक फार्स असल्याचे चित्र आहे. प्रदूषित पाणी इंद्रायणीमध्ये सोडल्याने प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. मागील काही दिवसांपासून इंद्रायणीवर पांढऱ्या रंगाचा फेस उफाळून आला आहे.
आळंदीतील सिद्धबेट, ज्ञानेश्वरी मंदिर, गरुड स्तंभ, पुंडलिक मंदिर तसेच, चऱ्होली, धानोरे या गावांना या प्रदूषित पाण्याचा सर्वात मोठा फटका बसत आहे. अनेकजण शेतीसाठी इंद्रायणी नदीच्या पाण्याचा वापर करत असल्याने शेतीतील मातीचा पोत घसरत असल्याचे चित्र आहे. तसेच, शेतमालालाही याचा परिणाम जाणवत असल्याचे चित्र आहे. मैलायुक्त पाणी इंद्रायणीत मिसळल्यामुळे जलवाहिनी, फुटवॉल्व्ह देखील खराब होत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
अनेकदा तक्रारी करून, तसेच सोशल मीडिया मीडियावरून इंद्रायणीच्या प्रदूषणाबाबत व्यथा मांडल्या गेल्या. मात्र, प्रशासनातील आयुक्त दर्जाचे अधिकारी, नगरसेवक असतील, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी डोळ्यावर पट्टी आणि कानावर हात बांधून असल्याचे चित्र आहे.
मागील काही महिन्यापासून सातत्याने प्रदूषणाबाबत सामाजिक कार्यकर्ते नागरिक, तसेच पत्रकारांच्या माध्यमातून आवाज उठवला जात आहे. आळंदी नगरपरिषद नव्याने निवडून आलेले सर्व नगरसेवक, तसेच मुख्याधिकारी मिळून आम्ही महापालिका आयुक्त, तसेच महापालिकेतील आमदार यांना भेटून इंद्रायणीच्या प्रदूषणाबाबत माहिती देऊन प्रदूषण कसे थांबवता येईल, याचा पत्रव्यवहार तातडीने करत आहोत. तसेच, इंद्रायणी उगम स्थान ते संगम स्थानापर्यंत प्रदूषण मुक्त इंद्रायणी हा पुढील काही महिन्यातील ठोस कार्यवाही करण्याचा आराखडा आळंदी नगर परिषदेच्या माध्यमातून, तसेच शासनाच्या माध्यमातून तातडीने मार्गी लावला जाणार आहे.
- प्रशांत कुऱ्हाडे, नगराध्यक्ष, आळंदी
आम्ही नेहमीच आळंदीत येतो. मात्र, मागील १० ते १२ वर्षांपासून इंद्रायणी स्नान करायला भेटलेच नाही. नदीपात्रात पाय ठेवले की वास येतो. स्नान करणे दूर ओंजळभर पाणी हातात घेण्याची इच्छा होत नाही. इंद्रायणी नदी वारकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असून, ती स्वच्छ असलीच पाहिजे.
- धनंजय घाटोळे, वारकरी, जालना
07032
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

