आळंदीत ‘इंद्रायणी’ स्वच्छतेसाठी मोहीम
आळंदी, ता. ४ : इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या अनुषंगाने जनजागृती व्हावी व लोकांमध्ये नदीविषयी आपुलकीची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने आळंदी नगर परिषदेच्या वतीने १३ फेब्रुवारीला सकाळी ८ ते ११ विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी (ता. ३) आळंदी नगरपरिषदेमध्ये झालेल्या विशेष सभेमध्ये मंजूर करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे आणि मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिली.
इंद्रायणी नदी उगमापासून ते तुळापूर संगमापर्यंत मोठ्या प्रमाणात प्रदूषित झालेली आहे. इंद्रायणी नदी पात्रावर असणारी शहर, गाव यांच्यातील सांडपाणी थेट नदीमध्ये सोडले आहे. आतापर्यंत अनेक मंत्री महोदय यांनी आळंदीमध्ये येऊन वेगवेगळ्या घोषणा केल्या. परंतु, त्या प्रत्यक्ष अमलात येताना दिसत नाहीयेत. इंद्रायणी नदी स्वच्छता करणे तसेच त्याचे महत्त्व पटवून देणे याकरिता सदर विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. सभेस आळंदी नगर परिषदेचे सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच आळंदी देवस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे तसेच विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील उपस्थित होते.
याबाबत माहिती देताना नगराध्यक्ष कुऱ्हाडे आणि मुख्याधिकारी खांडेकर म्हणाले, ‘‘या मोहिमेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी तसेच आळंदी नगरपरिषद हद्दीतील वारकरी शिक्षण संस्था यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. प्रत्येक नगरसेवक हे आपले १०० सहकारी घेऊन स्वच्छता मोहिमेसाठी उपस्थित राहणार आहेत. आळंदीतील गोपाळपुरा ते आळंदी नगरपरिषद कार्यालय स्मशान भूमीपर्यंत स्वच्छता करण्यात येणार आहे. त्यासोबतच पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पीएमआरडीए यांनाही सदर मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी विनंती पत्र देण्यात आले आहे.
मुख्याधिकारी खांडेकर यांनी प्रशासनामार्फत आत्तापर्यंत करण्यात आलेल्या कामांचा आढावा सादर केला. इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेसाठी आळंदीकर नागरिक व आळंदी देवस्थान यांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन केले.
आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी देवस्थानच्या वतीने नदी स्वच्छतेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य नगरपरिषदेला दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
‘या’ उपाययोजना राबविणार
-घाट परिसरात महिलांसाठी स्वतंत्र चेंजिंग रूम उभारणार
-घाटावर कपडे धुण्यावर पूर्णतः बंदी.
-नदीमध्ये फुले, नारळ, दिवे इत्यादी साहित्य सोडण्यास मनाई
-फेरीवाल्यांना घाट परिसरात बसू देऊ नयेत, यासाठी कडक अंमलबजावणी
-नदीमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई
-घाटावर निर्माल्य संकलनासाठी कलश / कंटेनर ठेवणार.
-नदी पुलावरील संरक्षण जाळ्या स्वच्छ करून त्यांना रंग देण्यात येणार
-घाट परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार
-सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे काम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही
इंद्रायणी नदी स्वच्छतेसाठी राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल. तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे आळंदी शहराचा सर्वांगीण विकास व सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा संकल्प आहे.
-प्रशांत कऱ्हाडे, नगराध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

