
आळे येथे महिलांचा माणसे जोडण्याचा संदेश
आळेफाटा, ता. १५ : येथील परिसरात महिलांनी विविध मंदिरांमध्ये ओवसा घेण्यासाठी गर्दी केली होती. तर आळे (ता. जुन्नर) येथील श्री. क्षेत्र रेडा समाधी मंदिरात महिलांनी एकत्र येऊन ‘माणसं तोडू नका तर माणसं जोडत जा’ हा संदेश सणाच्या माध्यमातून महिलांनी दिला.
परिसरातील महिला ३ ते ५ किलोमीटर अनवाणी पायाने मंदिरात जाऊन एकमेकींना ओवसा देऊन हळदी कुंकू लावून वाण देत होत्या. यावेळी ‘सीतेचा ओवसा, रामाचा ओवसा, जनम जनम हाच ओवसा’ म्हणत एकमेकींना ओवसा देत होत्या. पुरुष मंडळीही तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत होते. त्याच प्रमाणे तालुक्याच्या पूर्व भागातील ठिकाणी महिला मंदिरात जाऊन पूजा करत होत्या. रंगबेरंगी साड्या, विविध अलंकार परिधान करून आलेल्या महिलांनी मंदिराची प्रांगणे फुलली होती. शाळेला सुट्टी असल्याने मुले एकत्र येऊन पतंग उडवण्याचा आनंद घेतला. दूर असणारे मित्र व नातेवाइकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मेसेज करून शुभेच्छा दिल्या.