
आळेफाटा येथे पाचशे रुपयांवरून खून
आळेफाटा, ता. २५ : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे पाचशे रुपयांवरून टुरिस व्यावसायिकाचा मंगळवारी (ता. २४) रात्री खून झाला. विनायक ऊर्फ संतोष बबन गोडसे (वय ४२, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत आळेफाटा पोलिस ठाण्यामध्ये सचिन भीमाजी जाधव यांनी फिर्याद दिली. त्यानुसार त्यांचा टुरीसचा व्यवसाय असून, गोडसे हे त्यांचे मित्र असून, त्यांचाही टुरिसचा व्यवसाय आहे. त्यांच्या जवळ असलेली क्रुझर जीप (क्र. एम.एच.१४ डी.टी.५३०८) आळेफाटा येथे असलेल्या हैदराबादी यांच्या गॅरेजवर दुरुस्तीसाठी लावली होती व त्यासाठी ७६०० रुपये देण्याचे ठरवले होते. त्यानुसार मयूर अशोक सूर्यवंशी (रा. राजुरी, या. जुन्नर) या फिटरने काम केले. त्यानंतर विनायक याने मयूर यास ७१०० रुपये दिले, ५०० रुपये देणे बाकी होते. ते मागण्यासाठी मयूर हा विनायक याला फोन करत होता. तसेच, ‘माझे पैसे का देत नाही,’ अशी फोनवरून शिवीगाळ करत होता.
दरम्यान, मंगळवारी रात्री विनायक हा हैदरभाईच्या गॅरेजमध्ये गेला. तेथे त्याने मयूर याला, तू मला शिव्या का देतोस?’ अशी विचारणा केली. त्यावेळी मयूर याने विनायक याच्या छातीत व बगलेजवळ चाकू खुपसला. त्याला प्रथम उपचारासाठी माउली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्यास पुढील उपचारासाठी पुणे येथे जाण्यास सांगितले. मात्र, चाळकवाडी येथे त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, आरोपी मयूर याने विनायक याच्यावर हल्ला केल्यानंतर त्याच चाकूने स्वतःवर चाकू मारुन घेतला. त्याच्यावर आळेफाटा येथील एका खासगी रुग्णालयात पोलिस बंदोबस्तात उपचारासाठी दाखल केले आहे.