
पाचट, खोडवा व्यवस्थापन कार्यशाळेत सुलतानपूर येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन
आळेफाटा, ता.९ : ''''उसाच्या पाचटापासून सेंद्रिय खत तयार करावे. यामुळे जमिनीच्या भौतिक गुणधर्मावर अनुकूल परिणाम होऊन जमिनीचा पोत व जैविक सुधारणा होते.'''' असे मत ऊसभूषण उत्तम जाधव यांनी व्यक्त केले.
सुलतानपूर (ता.जुन्नर) येथे आयटीसी मिशन सूनहारा कल व डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर नारायणगाव व ग्रामपंचायत सुलतानपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पाचट व खोडवा व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
जाधव म्हणाले की, जे पाचट शिल्लक राहते ते कुट्टीच्या साह्याने बारीक करून शेतातच गाडावे. त्यापासून सेंद्रिय खताची निर्मिती करावी. पाचट पूर्णपणे सरीत दाबून टाकावे. त्यावर माती पाडावी. त्याचवेळी पाचटावर एकरी दोन बॅग युरिया, दोन बॅग सुपर फोस्पेट पावडर व पाचट कुजणाऱ्या जिवाणूंचे चार किलो कल्चर टाकावे. त्यानंतर शक्य असल्यास शेताला पाटाद्वारे पाणी द्यावे. पाचट ८०-९० दिवसात कुजून जाते त्यानंतर उसाच्या खोडव्यात भर देखील लावता येते.
डी.एस.सी.चे कृषिसहायक ओंकार पठारे यांनी सूत्रसंचालन तर विजय पोळ यांनी आभार मानले.
......................
02471