
पिंपळवंडी येथे २२ वर्षांनी पुन्हा भरला बारावीचा वर्ग
आळेफाटा ता. २ : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील सुभाष विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील २०००-०१मधील इयत्ता बारावीच्या विद्यार्थांचा स्नेहमेळावा नुकताच आयोजित केला होता. यावेळी २२ वर्षांनी जुने मित्र एकमेकांणा भेटल्याने सर्वजण भारावुन गेले होते.
याप्रसंगी सरस्वती माता, तसेच दिवंगत दशरथ काकडे, दिवंगत मारूती लेंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मनोरंजन वामन, संजय उंडे, नवनाथ डुबाले, राजाराम कापसे या गुरुजनांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आला.
यावेळी शिक्षकांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘‘आमचे विद्यार्थी हे डॉक्टर, इंजिनिअर झाले. कुणी शिक्षक, वकील, समाजसेवक, तर कुणी राजकारणी होऊन चांगल्या पदावर काम करत आहेत. याचा आम्हा शिक्षकांना अभिमान आहे.’’ याप्रसंगी डॉ. प्रशांत काळचे यांनी ‘चाळीशीनंतर आरोग्याची कशी काळजी घ्यावी’ या विषयावर मार्गदर्शन केले. तर, प्रा. संपत गुंजाळ यांनी ‘बदललेली शिक्षण पध्दती व पालकांची जबाबदारी’ याबाबत मार्गदर्शन केले. विनायक वामन, डॉ.प्रदिप टाकळकर, अजित लेंडे, स्वप्निल वाघ यांनी
स्नेहमेळाव्याचे नियोजन केले. संपत गुंजाळ व सुरेखा काकडे यांनी सुत्रसंचालन केले, आनंद नाईक यांनी आभार मानले.