
आळेफाटा, ता. २९ : व्यक्तिमत्त्व विकास हे शिक्षणाचे मूलभूत ध्येय असून, माझ्या महाविद्यालयीन शिक्षणात राष्टीय सेवा योजनेतून मिळालेल्या श्रम संस्कारातून आणि सामाजिक बांधिलकीतून माझ्यातील यशस्वी उद्योजक घडला,’’ असे प्रतिपादन सागर दांगट यांनी केले.
आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचलित बाळासाहेब जाधव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष विज्ञान व एम. एस्सी. भाग एकमधील नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभाप्रसंगी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दांगट बोलत होते.
यावेळी उद्योजक दांगट यांनी विज्ञान शाखेतील शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ५१ हजार रुपयांची देणगी महाविद्यालयास दिली.
याप्रसंगी ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष अजय कुऱ्हाडे, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव डॉ. अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, किशोर कुऱ्हाडे, भाऊ कुऱ्हाडे, बबन सहाणे, उल्हास सहाणे, बाबू कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, जीवन शिंदे, दिनेश सहाणे, कैलास शेळके, प्रदिप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, शांताराम कुऱ्हाडे आदी उपस्थित होते. प्राचार्य डॉ.प्रवीण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विभागाचे प्रा. डॉ. अरुण गुळवे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. अनुष्का गडगे व धनश्री कुटे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर यांनी आभार मानले.