‘एनएसएस - एक प्रभावी माध्यम’

‘एनएसएस - एक प्रभावी माध्यम’

Published on

आळेफाटा, ता. १९ : आजची तरुणाई स्पर्धात्मक, तंत्रज्ञानाधिष्ठित आणि स्वार्थलोलुपतेकडे वाहवत चाललेल्या जगात नि:स्वार्थ सेवेचा गाभा हरवून बसला आहे. ते अधिकाधिक तंत्रज्ञानाशी जोडली जात असली, तरी सामाजिक कार्यातील सहभाग, राष्ट्रीय एकात्मता, पर्यावरणीय समतोल आणि आदर्श नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या यापासून दूर जात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय सेवा योजना हे एक प्रभावी माध्यम ठरते.
हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता, राष्ट्रभावना, श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी अशा मूल्यांची जोपासना करण्यात मोलाची भूमिका बजावते. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना समाजकार्याच्या माध्यमातून वास्तव जीवनाशी जोडणे आणि त्यांना सामाजिक विकासात सक्रिय सहभागी बनवणे हा होता. ‘मी नाही, तर तू’ हे एनएसएसचे घोषवाक्य स्वतःपेक्षा समाजहित महत्त्वाचे मानण्याचे शिकवते. विद्यार्थ्यांमध्ये सेवा आणि समाजकार्याच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास करणे हा एनएसएसचा मूलभूत उद्देश आहे. गांधीजींच्या ग्रामीण विकास आणि स्वयंस्फूर्त सेवेच्या तत्त्वज्ञानावर आधारित ही योजना तरुणाईमध्ये स्वयंसेवेची भावना रुजवते.

आज एनएसएस ही देशातील सर्वांत मोठी विद्यार्थी चळवळ बनली असून सध्या ४० लाखांहून अधिक सक्रिय स्वयंसेवक भारतातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि माध्यमिक शाळांमध्ये युनिट्समध्ये सहभागी आहेत. आज तरुणाईवर अभ्यास, करिअरचा ताण आणि डिजिटल माध्यमांचा मारा सुरू असतो. यामुळे सहवेदना, सामाजिक जाणीव आणि बांधिलकी यासारख्या मूल्यांचा ऱ्हास होतो. ही चळवळ त्याविरुद्ध एक सकारात्मक उपाय असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना देशातील गरिबी, निरक्षरता, स्त्री-पुरुष असमानता, पर्यावरणीय हानी आणि अनारोग्य यासारख्या समस्यांचे प्रत्यक्ष अनुभव येतात. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यात या समस्यांवर उपाय शोधण्याची प्रेरणा निर्माण होते. हीच अंतःप्रेरणा विद्यार्थ्यांना निरीक्षकापासून कृतिशील नागरिक बनवते. महात्मा गांधी, स्वामी विवेकानंद, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याकडून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी याचा भाग व्हायला हवे.


एनएसएसमध्ये सहभागी होण्याचे फायदे
तरुणाईला वैयक्तिक, सामाजिक, करिअरविषयक आणि राष्ट्रीय पातळीवरील नागरिक म्हणून जबाबदाऱ्या समजून घेण्यात आणि त्या उत्तम प्रकारे पार पाडण्यासाठी एनएसएसचा फायदा होतो. त्यांच्यातील आत्मविश्वास, भावनिक समज वाढतात. विविध लोकांशी संवाद साधताना संवादकौशल्य वृद्धिंगत होते. या उपक्रमांमुळे स्वयंसेवक व समाजावर सकारात्मक परिणाम होतो. रक्तदान व आरोग्य जनजागृती शिबिरे, स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धन उपक्रम, साक्षरता व करिअर मार्गदर्शन कार्यशाळा, लिंगभेद, रस्ते सुरक्षेविषयक आणि व्यसनमुक्ती फेरी, आपत्ती निवारण व मदतकार्य असे उपक्रम विद्यार्थ्यांना कौशल्य वापरण्याची, समाजासाठी काही देण्याची संधी देतात.

- प्रा. डॉ. जयसिंग गाडेकर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी, बाळासाहेब जाधव महाविद्यालय, आळे (ता. जुन्नर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com