जैविक औषधांवर फुलविली काकडीची शेती
आळेफाटा, ता.४ : बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथील वंदना संतोष गुंजाळ यांनी नाझिया वाणाच्या केवळ वीस गुंठ्यांत काकडीची शेती फुलविली आहे. वेळोवेळी जैविक औषधांची फवारणी करून भरघोस उत्पादन घेतले. पहिल्याच तोड्यात ५०० किलोचे उत्पादन मिळाले. त्यांना १८ ते २० हजार रुपये खर्च आला असून, खर्च जाता ३० ते ३५ हजार रुपयांचा नफा मिळणार आहे.
बी.ए.पर्यंत शिक्षण झालेल्या वंदना गुंजाळ यांनी पतीच्या निधनानंतर न डगमगता घरची सुमारे पंधरा जमीन कसत आहेत. यंदा त्यांनी काकडीचे उत्पादन घेण्यासाठी २० गुंठे क्षेत्राची निवड केली. यामध्ये सुरुवातीला पाच फुटांच्या अंतरावर बेड पाडले. बेडवर शेणखत टाकून ट्रॅक्टरद्वारे मल्चिंग पेपर टाकून घेतल्यावर दोन फुटांच्या अंतरावर ४१०० रोपे आणून लावली. उत्पादन घेण्यासाठी त्यांना सासूबाई मिनाक्षी गणपत गुंजाळ व मुलगा ओंकार यांची मोलाची साथ मिळते.
नाझिया या संकरित काकडीचे वाण अधिक उत्पादन देणारे असते. कडू नसलेल्या या काकडीला चांगली चव असते. ज्यामुळे ती खाण्यासाठी उत्तम आहे. लागवडीनंतर सुमारे ४०-४५ दिवसांत काढणीसाठी तयार होते. लांबी आणि वजन, फळांची लांबी साधारणपणे १८-२० सेंटीमीटर असते आणि वजन १५०-१७० ग्रॅम असते.
- वंदना गुंजाळ, शेतकरी
07062