नंदीबैलवाले करतात परंपरा जपत समाजप्रबोधन
आळेफाटा, ता. ४ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये सध्या सकाळच्या प्रहारी दारोदारी नंदीबैल येत असल्याचे दिसून येत आहे. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात ग्रामीण भागातील प्रत्येक गावात नंदीबैल दारोदारी फिरताना दिसून येत असतो. नंदीला घेऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन समाजप्रबोधन करण्याचे काम केले जाते. काळानुसार बदल होत गेला असला तरी अनेक पिढ्यांपासून चालत असलेली परंपरा राजुरी येथील सटवा फुलमाळी आणि त्यांचे भाऊ साहेबराव, व्यंकू, बापू या मंडळींनी सुरू ठेवली आहे.
याबाबत फुलमाळी म्हणाले, ‘‘आमच्या घराण्याला अनेक पिढ्यांपासून नंदी बैलाला घेऊन घरोघरी जाऊन समाजप्रबोधन करण्याची परंपरा आहे. या अगोदर आमचे आजोबा आणि वडील हे काम करत होते. आता भाऊ आणि मी स्वत: हे काम करत असून आमची मुले ही कामे करतील की नाही यांत शंका असली तरी आम्ही हे काम मोठ्या आनंदाने करत आहोत. सध्याची मुले ही मोबाईल मुळे बिघडत चालली असून आपण आपल्या मुलांना जुने खेळ यामध्ये विंटू, दांडू, तिर तिर, लपवा छपवी, चल्लस आठ, आट्या पाट्या, गोट्या हे खेळ खेळण्यास सांगावे. तसेच काळानुसार एकत्रित कुटुंब राहिली नसल्याने माणूस माणसाला विसरत चालला आहे. सर्वांनी दररोज वाचन करावे, महिलांचा आदर करावा, व्यसनांपासून दुर रहावे, मांसाहार करू नये, मुलांना चांगले शिक्षण द्यावे आदी माहिती देऊन समाज प्रबोधनाचे काम करत आहेत.’’
आमच्या घराण्याला अनेक पिढ्यांपासून नंदीबैलाला घेऊन दारोदारी जाण्याची परंपरा आहे. आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील गावागावात जाऊन समाजहिताची माहिती देऊन समाज प्रबोधनाचे काम करत आहोत. लोक पूर्वीप्रमाणे नंदी दारात आल्यावर नंदीच्या कानात प्रार्थना करून आपल्या मनातली इच्छा मागून दान करत असे. परंतु काळानुसार समाज बदलत चालला असला तरी ग्रामीण भागातील लोक आजही चांगल्या प्रकारे सन्मान करून दान करत असतात. तसेच शासनाने आम्हाला मानधन सुरू करावे अशी मागणी करत आहोत.
सटवा फुलमाळी