आळेफाटा परिसरात सोयाबीन उत्पादनात मोठी घट
आळेफाटा, ता. ६ ः आळेफाटा परिसरातील आळे, कोळवाडी, राजुरी, उंचखडक, संतवाडी, वडगाव आनंद, जाधववाडी, बोरी बुद्रुक, बोरी खुर्द तसेच पुर्व भागातील गावांमध्ये सोयाबीन काढणीला वेग आला आहे. मात्र, ‘‘यंदा अतिपाऊस होऊन या परिसरातील शेतांमध्ये पाणी साचून पिके वाया गेली आहेत. एकरी आठ ते नऊ क्विंटल सोयाबीन उत्पादन अपेक्षित होते परंतु चार ते पाच क्विंटलच उतारा हाती येणार आहे. यातून सोयाबीनचा उत्पादन खर्चही निघणार नाही,’’ अशी व्यथा येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच, खराब हवामानामुळे आणि मजुरांच्या तुटवड्यामुळे सोयाबीन काढणीत शेतकऱ्यांची मोठी पळापळ होत आहे. पाऊस थांबल्याने काढणीला सुरूवात झाली असली तरी, मजूर मिळणे कठीण झाले आहे. जे मजूर मिळतात, ते चिखलात काम करण्यास तयार नसल्याने त्यांना जास्त मजुरी द्यावी लागत आहे, असेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
एकरी नांगरणीचा खर्च तीन हजार रुपये, फनपाळी दीड हजार रुपये, पेरणी दीड हजार रुपये, सोयाबीन बियाण्याची वीस किलोची पिशवी दोन हजार रुपये, खत दीड हजार रुपये, फवारणी तीन हजार रुपये, शेणखत सहा हजार रुपये, कापणी पाच हजार रुपये, मळणी तीन हजार रुपये असा एकूण पंचवीस हजार पाचशे रुपये प्रति एकर खर्च येतो. जर एकरी पाच क्विंटल सोयाबीनचे उत्पादन हाती आले तर सद्याच्या चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार भावाप्रमाणे शेतकऱ्याच्या हातात बावीस हजार पाचशे रुपये पडतात म्हणजेच भांडवल पण पदरमोड करून घालावे लागले आहे.
- बाबाजी बांगर, शेतकरी.