गाईंच्या नियोजनबद्ध संगोपणामुळे दुग्ध व्यवसायात भरारी
आळेफाटा, ता.१२ : राजुरी (ता. जुन्नर) येथील मोहन भिमाजी हाडवळे यांनी नोकरीच्या पाठीमागे न लागता एका गाईच्या जोरावर दुग्ध व्यवसाय सुरू केला. योग्य नियोजनबद्ध गाईंचे संगोपन, जिद्द अन् चिकाटीच्या जोरावर त्यांनी दुग्ध व्यवसायात प्रगती साधली आहे. सध्या त्यांच्या गोठ्यात २० गाईंचा मुक्त संचार आहे. ते दररोज १२० लिटर दुधाचे उत्पादन घेत आहेत.
नियोजनबद्ध संगोपन, गायींच्या आरोग्याची काळजी तसेच मुलांप्रमाणे सांभाळ करत हाडवळे यांनी प्रगती साधली आहे. आता त्यांच्या मुक्त गोठ्यात २० गाई व पाच वासरे बागडत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत असताना हाडवळे यांचे शिक्षण एम.ए. पर्यंत झाल्याने चांगल्या पगाराची नोकरी सोडून आपल्या आई वडिलांची सेवा करता यावी तसेच लहानपणापासून शेतीची आवड असल्याने त्यांनी शेती बरोबर दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरवले.
गायींचे संगोपन करण्यासाठी शेतात मका, गवत, कडवळ ही पिके घेतली व मुरघासाची व्यवस्था केली. दररोज या गायींसाठी पाचशे किलो मुरघास व सुग्रास ५० ते ६० किलो खाद्य दररोज दिले जात आहे. विशेष म्हणजे त्यांनी १० गुंठ्यांत ६० बाय ४० फूट असा मुक्त गोठा बनवला.
गाईंना दररोज लागणाऱ्या खाद्यासाठी त्यांच्याजवळ असलेल्या शेतावर यामध्ये मका व हत्ती गवत लावले आहे. मुरघास तयार करून ठेवण्यात आला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने ते या गाईंचे संगोपन करत आहेत. यामधून दररोज १२० लिटर दूध निघत असून, आठवड्याला एक ट्रॉली शेणखत निघत आहे व यामधुन चांगला मिळत आहे.
दरम्यान, दुग्ध व्यवसायाच्या वृद्धीसाठी हाडवळे यांना त्यांचे भाऊ मनोज तसेच दुसरा भाऊ ‘टिंग्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश व पत्नी मनीषा यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे
शेती करत असताना पालेभाज्या तसेच इतर पिकांना कुठल्याही प्रकारचा हमीभाव मिळत नसल्याने शेती करणे अडचणीतच येऊ लागली. त्यामुळे शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी एक गाई विकत घेतली. तिच्या जोरावर प्रगती साधली. चांगल्या पद्धतीने गाईंचे पालन पोषण केल्याने व्यवसाय फायदेशीर ठरत आहे.
- मोहन हाडवळे, दूध उत्पादक
07169