Pune Leopard: "विद्यार्थ्यांनी शाळेच्या मार्गावर गटाने, मोठ्याने बोलत जावे", बिबट्यांचा हल्ला आणि वनविभागाचे आवाहन
आळेफाटा, ता. २५ : ‘‘पिंपरखेड घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत येताना व जाताना गटाने व मोठ्याने बोलत जावे,’’ असे आवाहन वनरक्षक कैलास भालेराव यांनी आळे या ठिकाणी केले.
बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षिततेसाठी करावयाच्या उपायोजनांतर्गत आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ संचालित ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मंगळवारी (ता. २५) वनविभागामार्फत जनजागृती व्याख्यानाचे आयोजन केले होते, त्या प्रसंगी मार्गदर्शन करताना भालेराव बोलत होते. या प्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य संदीप भवारी, उपप्राचार्य सुनील कोते, अमर भुंतांबरे आदी उपस्थित होते. संतोष सहाणे यांनी प्रास्ताविक केले.
भालेराव म्हणाले, ‘‘आपण बिबट प्रवण क्षेत्रात समाविष्ट होत असल्याने घराभोवती कुंपण असावे. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. घराभोवती झाडे झुडपे नसावीत. बिबट्या हा प्रामुख्याने मान किंवा गळा धरत असल्याने गळ्याभोवती मफलर किंवा स्कार्फ हा बांधलेला असावा. बिबट्यांचा पाठलाग करू नये. त्यांना हात लावू नये. तसे व्हिडिओ चित्रित करू नये. अफवा पसरवू नये.’’
तसेच यावेळी भालेराव यांनी, पशुधनाची काळजी कशी घ्यावी, सर्व प्रकारचे प्राणी बिबट्याचे भक्ष्य असल्याने हल्ले कसे होतात, तसेच आपल्या शेतात किंवा घराजवळ वापरात नसलेले शेड बंद करून ठेवावे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच, बिबट्या दिसल्यास १९२६ या आपत्ती क्रमांकाला फोन करावा, असे सांगितले.
