
पारगावमधील ऊस शेतीची विशेषज्ञ रासकरांकडून पाहणी
बेल्हे, ता. २१ : पारगावतर्फे आळे (ता. जुन्नर) येथील ऊस उत्पादक शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण यांच्या ऊस शेतीची पाहणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगावचे ऊस विशेषज्ञ डॉ.भरत रासकर यांनी नुकतीच केली. महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत आयोजित "माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या उपक्रमांतर्गत मुक्कामी थांबून चव्हाण वेगवेगळे प्रयोग व परिसरातील उसाचे कौतुक केले.
ऊस शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, माती परीक्षणाचे महत्त्व, सुपर केन ऊस रोप लागवड, ऊस खोडवा व्यवस्थापनात पाचटाचे महत्त्व व डॉ.रासकर यांच्याच मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञांनी उसाचा नव्यानेच संशोधित आणि प्रसारित केलेला वाण पीडीएन १५०१२ विषयी शेतकऱ्यांना विस्ताराने मार्गदर्शन केले.
विकास चव्हाण यांच्या ऊस शेतीतील वेगवेगळे प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून घेत असलेले विक्रमी उत्पादन, आधुनिक बेणेमळा पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी ऊस खोडवा व्यवस्थापन आणि सुपर केन नर्सरी चळवळ या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी विकास वाळुंज, विघ्नहर सहकारी साखर कारखानाचे दीपक खराडे, गणेश घोलप, कृषी मित्र उत्तम जाधव, किरण सोंडकर, विश्राम चव्हाण, श्रीराम चव्हाण, दीपक चव्हाण, बाळासाहेब डुकरे, पंकज डुकरे, अक्षय डुकरे शेतकरी उपस्थित होते.
01698