जखम मांडीला, अन् मलम शेंडीला!
जखम मांडीला, अन् मलम शेंडीला!
(बिबट्याचे महाराष्ट्र शासनाला अनावृत्त पत्र)
आदरणीय मुख्यमंत्री महोदय,
महाराष्ट्र शासन.
बिबट्याचा सस्नेह नमस्कार...
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही आता आमचा विषय गाजतोय. साहेब, जुन्नर वनविभागाचे कार्यक्षेत्रातील एका उसाच्या शेतात आमचा नर- मादीचा संसार सुखाने सुरू आहे. आमच्या आजूबाजूला आमचे भाऊबंद मोठ्या संख्येने राहत असल्याने आम्हांला सोयरिकीला अथवा सणासुदीला दूरच्या गावी जावे लागत नाही. गेल्या अनेक पिढ्यांपासून आमचा जंगलांमध्ये रहिवास होता, पण लोकांनी जंगलतोड केल्याने गेल्या पाच- पंचवीस वर्षांपासून आम्ही उसाच्या शेतांमध्ये मुक्काम हलवला आहे. तुमच्या एका मंत्री महोदयांनी फर्मान काढले आहे की, बिबट्यांना खाद्य म्हणून जंगलात मोठ्या प्रमाणात शेळ्या सोडू...आम्हाला काय स्वप्न पडलंय का तिकडे जंगलात आमच्यासाठी तुम्ही शेळ्या सोडताय म्हणून! हा निर्णय म्हणजे ‘जखम मांडीला, अन् मलम शेंडीला’! खरं म्हणजे रोगापेक्षा हा इलाज भयंकर आहे. आमच्यासाठी कायमस्वरूपी अधिवास असणारी उपाययोजना (पर्यायी व्यवस्था) केली तरच काहीतरी साध्य होईल, अन्यथा ‘येरे माझ्या मागल्या आणि ताक कण्या चांगल्या’ असे म्हणायची वेळ येईल.
ऊस क्षेत्रात असलेली लपण, पिण्याचे पाणी, सहज उपलब्ध होणारे भक्ष्य यासारख्या चांगल्या सुखसुविधा असल्याने आमची संख्या वाढल्याने जुन्नर वनविभागात तर आम्ही आमची गावेच्या गावे वसवली आहेत. आमची तशी माणसांशी कोणतीही दुश्मनी नाही. तुम्ही जंगलतोड करून आमच्या हक्कावर गदा आणता, शेवटी आमचाही काही हक्क आहेच ना! निसर्ग नियमानुसार १४ महिन्यांत आमची दोन वेत तर हमखास होतात. एकावेळी एका वेताला ३ बछडे, तर दोन वेतांना मिळून ६ बछडे होतात. एखाद- दोन दगावले तरी चार तर हमखास जगतात. मग का नाही आमची संख्या वाढणार? आम्हांला काही माणसांसारखे नियम नाहीत की दोनच पुरे! बरं, तुम्ही आमची नसबंदी करण्याचा निर्णय घेतला, असे कळले. आमची सरसकट नसबंदी करणार नाहीत, याची आम्हांला खात्री आहे, कारण आम्ही शेड्युल १मध्ये आहोत.
सध्या सगळीकडे आमची दहशत असल्याने कोणताही शेतकरी शेतात काम करायला तयार नाही. तिकडे आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, तसेच शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही आमचा बंदोबस्त करण्यासाठी नुसती आमच्या विरोधात राळ उठवली आहे. त्यात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आमच्यासारखी वेशभूषा करून, ‘प्रत्येकी एक हजार बिबटे बसू शकतील एवढ्या क्षमतेची दोन रेस्क्यू सेंटर बनवा,’ अशी मागणी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात तुमच्याकडे करत या समस्येकडे लक्ष वेधले आहे. एक रेस्क्यू सेंटर जुन्नर भागात, तर दुसरे अहिल्यानगर भागात बनवा, अशीही त्यांची सूचना आहे. एका रेस्क्यू सेंटरमध्ये फक्त नर बिबटे, तर दुसऱ्या रेस्क्यू सेंटरमध्ये फक्त मादी बिबटे ठेवण्याची त्यांची सूचना आमच्यावर अन्यायकारक असली, तरीही सध्याच्या परिस्थितीत सुरुवातीच्या टप्प्यासाठी योग्य आहे. किमान आम्हांला पिंजऱ्यात पकडण्याच्या मोहिमेला तरी वेग येईल. आम्हांला सर्वांना पिंजऱ्यात पकडून कायमस्वरूपी तयार केलेल्या अधिवासात स्थलांतरित करण्यापर्यंतच हे रेस्क्यू सेंटर कार्यान्वित ठेवणे व्यावहारिक ठरेल. तसेही आम्हांला तुम्ही एकत्र ठेवून किती दिवस पोसणार? त्यामुळे पुन्हा ‘लाडके बिबटे’ म्हणून विरोधक तुम्हांला धारेवर धरतील, याची काळजी वाटते.
याअगोदर विधानसभा- लोकसभा निवडणुकीसाठी आमच्यापासून मुक्तता हा कळीचा मुद्दा ठरत होता. आता येऊ घातलेल्या जुन्नर- आंबेगाव विभागातील झेडपी- पंचायत समिती निवडणुकीसाठीसुद्धा पुन्हा आमचाच मुद्दा ऐरणीवर राहणार आहे. आमच्यासाठी कायमस्वरूपी स्वतंत्र अधिवास निर्माण करा आणि आम्हांला सर्वांना पकडून तिकडे पाठवा. पण, केवळ जनभावना शांत होण्यापुरती तात्पुरती उपाययोजना केली तर आहे ती समस्या तशीच राहील आणि पुन्हा आमची संख्या वाढत जाईल. गेल्या पंधरा- वीस वर्षांपूर्वी जुन्नर वनविभागाचे तत्कालीन उपवनसंरक्षक अशोककुमार खडसे यांनी आम्हाला पकडुन दुसरीकडे सोडण्याची मोहीम प्रभावीपणे राबवली होती. पण, पुन्हा कालांतराने काय झाले? या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने आमची संख्या झपाट्याने वाढत गेली.
मानवावरील हल्ल्यांच्या घटना आमच्याकडून घडल्या, हे खरे आहे, पण माणसांवर हल्ले करण्याची आम्हाला काही हौस नाही. आमच्याकडून आगळीक झालीही असेल, पण नाण्याला दुसरी बाजू असते, हेही ध्यानात घ्या. तुम्ही एकाला पकडले की आमची जागा घेणारा दुसरा बिबट्या हजरच असतो. माणसांनीच आमच्यावर अन्याय केला आहे, आमची पहिली सोय लावा. प्रथम आमच्या हिताचा निर्णय घ्या अन् मग इतरांकडे पाहा. जसा माणसांना जगण्याचा अधिकार आहे, तसा आम्हालाही जगण्याचा अधिकार आहे. आमच्यासाठी कायमस्वरुपी स्वतंत्र अधिवास निर्माण केला तर तुमच्या माणसांच्या राज्यापेक्षा आमच्या बिबट्यांच्या राज्यात (स्वतंत्र अधिवासात) आम्ही सुखी राहू आणि तुम्ही- आम्ही सगळे जण पुन्हा गुण्यागोविंदाने नांदू...
(लेखन- अर्जुन शिंदे, बेल्हे)
बिबट्या एकजुटीचा विजय असो!!!
आपलाच,
- जुंदरी बिबट्या,
मु. पो. उसाचे शेत, जुन्नर वनविभाग कार्यक्षेत्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

