आणेमध्ये रंगदास स्वामींचा पुण्यतिथी सोहळा
बेल्हे, ता. २० : आणे (ता. जुन्नर) येथे आज (ता. २०) श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळ्यानिमित्त, हजारो भाविकांनी पारंपरिक आमटी-भाकरी महाप्रसादाचा आस्वाद घेतला. हा महोत्सव आज व उद्या रविवार (ता. २१) दोन दिवस चालणार आहे.
आणे येथे श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सव सोहळ्याचे हे १३८ वे वर्ष आहे. दुपारी १२ वाजता स्वामींची महाआरती झाली. यावेळी आमटी महाप्रसादासाठी देणगीरूपाने संपूर्ण मसाल्याचा खर्च करणाऱ्या दानशूर अन्नदात्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वर्षीच्या प्रसिद्ध आमटी महाप्रसाद बनवण्यासह मसाल्याचा खर्च सुमारे २१ लाख रुपये असणार आहे. यावर्षी पुण्यतिथी महोत्सव सोहळ्याच्या दोन दिवसात देणगीदारांच्या देणगीतून ५०० लिटर क्षमतेच्या एकूण ८५ कढया आमटी बनवली जाणार आहे. याठिकाणी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिक बाजरीच्या भाकरी बनवून वाजत-गाजत आणून देतात. दरम्यान २०३३ पर्यंत आमटी महाप्रसाद बनवण्यासाठी मसाल्यासह लागणाऱ्या खर्चाचे देणगीदारांचे अगोदरच बुकिंग झालेले असल्याचे देवस्थान संस्थेचे अध्यक्ष मधुकर दाते यांनी सांगितले. गेल्या वर्षीपासून देवस्थान संस्थेच्या वतीने १०० आणि २५० ग्राम पॅकिंगमध्ये श्रीरंग सात्त्विक आमटी मसाला नावाने भाविकांना मागणीनुसार मसाला उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच ५ लिटर क्षमतेच्या किटलीमध्ये भाविकांना अल्प किमतीत घरी नेण्यासाठी आमटी महाप्रसाद देण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. रविवारी (ता. २१) सकाळी काल्याचे कीर्तन होणार असून या दिवशीही आमटी-भाकरी महाप्रसाद वाटप सुरू राहील.

