

अखेर त्या पराभवाची सल एकदाची संपली
आळे-पिंपळवंडी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेचे उमेदवार मंगेश काकडे यांनी, त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय कुऱ्हाडे यांना पराभूत करून विजयाची माळ गळ्यात घातली. गत निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शरद लेंडे यांच्याकडून, शिवसेनेच्या मंगेश काकडे यांना केवळ एका मताने निसटता पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाची सल त्यांच्या मनात कायम होती. यावेळी त्यांनी गत वेळच्या निवडणुकीतील पराभवाची सल या निवडणुकीत संपविली.
किती पण लावा ताकद, वादळ नाही हटत
बारव-तांबे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार मोनाली लांडे यांनी, त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी शिवसेनेच्या उमेदवार सुनीता बोऱ्हाडे यांचा पराभव केला. मोनाली लांडे या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या स्नुषा असून, देवराम लांडे हे नेहमी स्वतःचा कायम ‘आदिवासी वादळ’ म्हणून उल्लेख करतात. यावेळी जुन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ‘किती पण लावा ताकद, वादळ नाही हटत! जंगल भी वही है, और राजा भी वही रहेगा’ असे कार्यकर्त्यांच्या हातात लिहिलेले फलक विजयानंतर देवराम लांडे यांनी झळकविले. जल्लोषपूर्ण वातावरणात त्यांनी पहिलवानाच्या आवेशात ठोकलेला शड्डू चर्चेचा विषय ठरला.
पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर खंडागळे यांच्या पदरी निराशा
बोरी बुद्रुक-खोडद जिल्हा परिषद गटात झालेल्या तिरंगी लढतीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या स्नुषा अपक्ष उमेदवार कविता पवार तसेच शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे यांच्या पत्नी जयश्री खंडागळे यांनी निवडणुकीपूर्वी ऐनवेळी पक्षबदल करूनही त्यांचा पराभव झाल्याने, यावेळी पांडुरंग पवार आणि ज्ञानेश्वर खंडागळे यांच्या पदरी निराशा आली. दरम्यान या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार कल्पना काळे यांनी विजय संपादन करत, या दोन्ही बड्या नेत्यांवर केलेली मात लक्षवेधी ठरली.
चौथ्यांदा विजयाचे स्वप्न हवेत
सावरगाव-कुसूर जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या भाजपच्या उमेदवार आशा बुचके यांना, यावेळी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. यावेळी त्यांचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार गुलाब पारखे यांनी पराभव केला. यापूर्वी बुचके यांनी पुणे जिल्हा परिषदेत सलग तीनवेळा विजय संपादन करून प्रतिनिधित्व केले होते. मात्र त्यांचे चौथ्यांदा जिल्हा परिषदेत जाण्याचे स्वप्न हवेत विरले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.