आणे परिसरातील तलावांच्या खोलीकरणाची मागणी
बेल्हे, ता. ११ : जुन्नर तालुक्याच्या पूर्व पठार भागावरील आणे परिसरातील पिवळगोटी व बाळंद्री पाझर तलावांचे एकत्रीकरण, रुंदीकरण, खोलीकरण, तसेच पेमदरा शिवारातील चोळीच्या बंधाऱ्याचे (मायनर टँक) खोलीकरण करून पुनरुज्जीवन करण्यात यावे, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.
आणे पठारावरील आनंदवाडी परिसरात जिल्हा परिषदेच्या जलसंधारण व नाला बंडिंग विभागाच्या माध्यमातून सुमारे ४० वर्षांपूर्वी पिवळगोटी व बाळंद्री हे दोन पाझर तलाव बांधले आहेत. तसेच, वर्ष १९९८मध्ये पेमदरा परिसरात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून चोळी मायनर टँकची (बंधारा) निर्मिती केली आहे. या पाझर तलावांतील पाण्यावर शेतकऱ्यांची पिके आणि जनावरांचा चारा अवलंबून आहे. आणे पठार येथील चोळी मायनर बंधारा खोलीकरण, तसेच पिवळगोटी व बाळंद्री या पाझर तलावांचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी येथील शेतकरी वर्गाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे.
पिवळगोटी व बाळंद्री या दोन्ही तलावांच्या मधल्या जागेत साधारणपणे १० ते १५ एकर जमीन पडीक असून, खडकाळ माळरान असल्याने संबंधित शेतकऱ्यांना त्याठिकाणी शेती करणे शक्य होत नाही. संबंधित शेतकऱ्यांच्या परवानगीने या ठिकाणचा खडक फोडून त्याचा उपयोग रस्त्यांच्या कामासाठी केल्यास पाझर तलावांचे एकत्रीकरण, तर होईलच पण भविष्यात पाणीसाठा वाढून आनंदवाडी वस्तीबरोबरच आनंदवाडी, भट्टी, महान डोंगर हा आणे व पेमदरा गावांच्या दक्षिणेकडील सुमारे दोन हजार एकर आणि तळाई कुरणाचा सुमारे दीड हजार एकर क्षेत्राला फायदेशीर ठरू शकणार आहे.
दरम्यान, परिसरात जलतारा संस्थेच्या माध्यमातून शोषखड्डे खोदण्याचेही काम करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पेमदरा हद्दीतील चोळी मायनर टँकची सध्याची खोली ३० ते ३५ फूट असून, त्याखाली असलेल्या बेसॉल्ट खडकांच्या थरांमुळे पाणी न जिरता सांडव्यावाटे वाहून जाते. त्यामुळे या बंधाऱ्याचे खोलीकरण करणे गरजेचे आहे. यामुळे परिसरातील सुमारे ३ हजार ५०० एकर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते असे परिसरातील शेतकरी वर्गाचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

