‘भीमाशंकर’ १२ लाख टन ऊस गाळप करणार

‘भीमाशंकर’ १२ लाख टन ऊस गाळप करणार

Published on

पारगाव, ता. ३ : ‘‘पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने चालु गाळप हंगामासाठी १२ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दृष्टीने कारखाना प्रशासनाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुधारित ऊस बेणे, एआय तंत्रज्ञान, ठिबक सिंचन आदी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उसाच्या उत्पादनात वाढ होऊन सर्व संकटावर मात होईल. भीमाशंकर देशात व राज्यात वरचा झेंडा फडकवेल,’’ असे प्रतिपादन कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
भीमाशंकर कारखान्याच्या २६ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन व गव्हाण पूजन गुरुवारी (ता. २) दसऱ्याच्या मुहूर्तावर वळसे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, विष्णू हिंगे, पूर्वा दिलीप वळसे पाटील, मानसिंग पाचुंदकर, युवराज बाणखेले, शिवाजीराव ढोबळे, अरुण गिरे, प्रकाश पवार, रवींद्र करंजखेले, कारखान्याचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, सचिव रामनाथ हिंगे व आंबेगाव, जुन्नर व शिरूर तालुक्यातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार व प्रवचनकार उपस्थित होते.
वळसे पाटील म्हणाले, ‘‘पारदर्शक कारभार करायचे ठरवल्यामुळे कारखाना सुस्थितीत आहे. त्यामुळे मागील हंगामात ३२९० रुपये बाजारभाव दिला. या वर्षी मे महिन्यात पाऊस सुरु झाला तो अद्याप थांबलेला नाही. राज्यात २० जिल्ह्यांना पावसाचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस तोड कामगार मराठवाड्यातून येतात पुर परिस्थितीचा येणाऱ्या हंगामावर परिणाम होणार आहे. तालुक्यातील युवकांनी हार्वेस्टर खरेदी करावे. त्यासाठी कारखाना ३५ लाख रुपये पाच वर्षासाठी बिनव्याजी देत आहे. बँकाही अर्थसाह्य करत आहे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी. सुधारित बेणे, एआय तंत्रज्ञान व पाण्यासाठी ठिबकचा वापर करावा. एकरी १०० टन ऊस उत्पादन नेण्याकडे लक्ष द्यावे. उत्पादन वाढले तर लांबून ऊस आणावा लागणार नाही. खर्च कमी होईल. त्यामुळे बाजारभाव जास्त देता येईल. कारखाना यावर्षी पूर्ण क्षमतेने डिस्टिलरी प्रकल्प चालवणार आहे. कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के दिवाळी बोनस देण्यात येणार आहे.’’
प्रास्ताविक करताना अध्यक्ष बेंडे म्हणाले, ‘‘राज्य सरकारच्या मंत्री समितीने एक नोव्हेंबरला गाळप सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वर्षी ११ लाख ३८ हजार ४९६ टन उसाचे गाळप केले आहे १२ टक्के साखर उतारा मिळाला एफआरपीपेक्षा जास्त दर दिला तो दिवाळीपूर्वी ऊस उत्पादकांना देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी ऊस उत्पादकांच्या बँक खात्यात रक्कम वर्ग केली आहे. या वर्षी उसाची उपलब्धता कमी असली तरी पाऊस चांगला झाल्याने उत्पादन वाढेल. त्यामुळे मागील वर्षापेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे.’’
पोपटराव गावडे, नवनाथ महाराज माशेरे, गणेश महाराज वाघमारे, राजाराम महाराज जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. नीलेश पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. संचालक दादाभाऊ पोखरकर यांनी आभार मानले.

पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात
राज्यातील साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गाळप हंगामातून प्रती टनामागे पाच रुपयांप्रमाणे पूरग्रस्तांसाठी देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरासरी १० लाख टन गाळप धरले तरी ‘भीमाशंकर’कडून ५० लाखापर्यंत पूरग्रस्तांना मदत जाणार आहे. राज्यातील पुरपरिस्थितीचे संकट मोठे आहे, आपणही काही ना काही मदत केली पाहिजे. त्यामुळे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा व आम्ही तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत बैठक घेतली. त्यामध्ये अर्ध्या तासातच तालुक्यातील संस्था, वैयक्तिक, विविध संस्थांचे कर्मचारी यांच्यामार्फत पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक किराणा साहित्याचे १२ हजार कीट पाठवण्यासंदर्भात निर्णय झाला. एका किटची किमत ७५० रुपये आहे. सुमारे ९० लाख रुपयांचे साहित्य पाठवण्याचा निर्णय झाला असल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले. तसेच, त्यांनी गव्हाण पुजन कार्यक्रमात भीमाशंकर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांना द्यावा, असे आवाहन केले. त्यावर सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हात वर करून संमती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com